आरोग्य व सौंदर्य
तुम्हालाही होतो का ऍसिडिटी चा त्रास ; आहारात करा या गोष्टीचा समावेश

मुंबई / नवप्रहार मीडिया
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेवर जेवण करण्यात येत नसल्याने तसेच फास्ट आणि जंक फुड खाण्यात येत असल्याने ऍसिडिटी चा त्रास ही सामान्य समस्या झाली आहे. नियमित खानपान आणि जेवणात काही गोष्टीचा समावेश केल्यास या पासून सुटका करता येऊ शकते.
उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो. काही वेळा कोणत्याही कारणांमुळे अॅसिडिटी अर्थात पित्त होणं किंवा छातीत जळजळ होणं, मळमळणं अशा समस्या जाणवतात. छातीत जळजळ होणं किंवा पोटातलं पित्त घशापर्यंत येणं याला अॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. या आजाराला गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स अर्थात जीईआरडी असंही म्हणतात. अशा प्रकारचा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं असतं; पण आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास या समस्येचं निराकरण होऊ शकतं. अॅसिड रिफ्लक्सचा त्रास टाळण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत ते सविस्तर जाणून घेऊ या. `नवभारत टाइम्स`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
सातत्याने अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असेल तर त्याकडे कदापि दुर्लक्ष करू नये. पोटातलं अॅसिड घशापर्यंत येत असल्याने छातीत जळजळ जाणवते. याला गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. छातीत जळजळ होणं, छातीच्या मध्यभागी जळजळ जाणवणं, तोंडात आंबट पाणी येणं, खोकला किंवा वारंवार उचकी लागणं, कर्कश आवाज येणं, दुर्गंधी, सूज येणं किंवा आजारी वाटणं अशी लक्षणं या आजारात दिसून येतात. जेवण झाल्यावर झोपताना किंवा खाली वाकताना ही लक्षणं जास्त तीव्र जाणवतात.
आयुर्वेदिक डॉक्टर निजिली एच.आर. यांनी पित्त कमी करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि अॅसिडिटीसह पोटाच्या अन्य समस्या दूर होण्यास मदत होते. यात गहू, गुलकंद, डाळिंब, ड्रायफ्रुट्स, तूप, आवळा, रताळी, भोपळा, पांढरा भोपळा, टरबूज, पेरू, कारले, शहाळं, केळी, धणे आणि बडीशेप यांचा समावेश आहे.
अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्सची समस्या असेल तर गुलकंद पाण्यात टाकून चघळावा. तसंच गुलकंद दुधात घालून प्यायल्यासदेखील या समस्या कमी होऊ शकतात. काळ्या मनुका पचनासाठी हितावह मानल्या जातात. पचनासाठी रिकाम्या पोटी काळ्या मनुका खाऊ शकता. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात 10 ते 15 मनुका रात्रभर भिजत ठेवाव्यात. सकाळी उठल्यावर पाणी काढून टाकून या मनुका खाऊ शकता.
अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी संपूर्ण गव्हाची चपाती किंवा संपूर्ण धान्याची चपाती हा उत्तम पर्याय आहे. संपूर्ण धान्यात फायबर मुबलक असतं त्यामुळे पचनास मदत होते आणि छातीत होणारी जळजळ कमी होते. ब्राउन राइस हे एक संपूर्ण धान्य आहे. यात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि मिनरल्स मुबलक असतात. यामुळे अन्ननलिकेच्या स्नायूंना आराम मिळतो आणि अॅसिड रिफ्लक्स कमी होतो.
मुगाच्या डाळीत फायबर्स मुबलक असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. तसंच चयापचय क्रियेला वेग येतो. फायबरमुळे मल नरम होतो त्यामुळे शौचास सहज होते. मुगाची डाळ खाल्ल्यानं अपचन, अॅसिडिटी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. अॅसिड रिफ्लक्सची समस्या कमी होण्यासाठी अर्धा चमचा साखरेत बडीशेप मिसळावी. जेवणानंतर दिवसातून दोन वेळा हे मिश्रण खाल्ल्यास फायदा होतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे पचन सुधारतं आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.