पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर करून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक जलपूर्तीचे नियोजन करा-आ.सौ. सुलभाताई खोडके
अमृत -२ पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामांचा आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी घेतला आढावा.
अमरावती (प्रतिनिधी) अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणात भरमसाठ पाणी साठा असतांना मात्र शहरवासीयांना अपुऱ्या व अर्थवट पाणी पुरवठ्याची झळ सहन करावी लागते. आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची कामे तसेच पाणी पुरवठ्याच्या सुक्ष्म नियोजन करणे महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर करून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक जलपूर्तीचे नियोजन करण्याच्या सूचना अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
शुक्रवार दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सभागृहात केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा-१ अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजना तसेच अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा अंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. शहरात अमृत- अभियान १ अंतर्गत ५०० किलोमीटर ची पाईप लाईन टाकण्यात आली असून ६१ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्दीकरण केंद्र तपोवन परिसरात उभारण्यात आले आहे. अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून शुद्ध पाण्याची ऊर्ध्ववाहिनीची देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ११ जलकुंभ बांधण्यात आले असून १०० टक्के काम पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आले आहे. सिंभोरा येथे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कारणाने पाणी पुरवठ्यात अडचणी उद्भवत असल्याने आता त्या ठिकाणी ३३ केव्ही विद्युत पुरवठा युनिट उभे करण्यात आले आहे. अशी माहिती मजीप्रा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी आमदार महोदयांनी सर्व तांत्रिक बाबी तपासून तसेच काही प्रमाणात ट्रायल घेऊन अस्तित्वातील पाईप लाईन मधील अडथळे लक्षात घेता व आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्यात. आगामी उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी पुरवठ्याची उपलब्धीला घेऊन झळ पोहोचू नये, यासाठी संर्व अधिकाऱ्यांनी योजनेच्या कामांची परिस्थिती व उपाययोजनांना घेऊन विशेष ड्राइव्ह घेऊन सूक्ष्म निरीक्षण करण्याच्या सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने देण्यात आल्या.
तसेच केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा -२ अभियान अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेसंदर्भातही बैठकीत खल देण्यात आला. सिंभोरा हेडवर्क्स ते नेर पिंगळाई संतुलित टाकी पर्यंत १४०० मिमी व्यासाची मृदू पोलादी समांतर ऊर्ध्ववाहिनी अंथरणे, व पुढे अमरावती जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत १९५० मिमी व्यासाची मृदू पोलादी गुरुत्व वाहिनी अंथरणे, महादेव खोरी येथे जलशुद्धीकरण केंद्र, यासह संतुलित टाकी व उंच टाक्या तसेच मशिनरी पुरविणे, ३३ केव्ही उंचदाब विद्युत करीता भूमिगत केबल पुरविणे व अंथरणे, फिडर शिफ्टिंग अशी कामे करण्यात येणार आहे. यामध्ये सध्या स्थापत्य कामे (civil work ) प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. मात्र योजना कार्यान्वित होण्याला विलंब लागू नये म्ह्णून मजीप्रा प्रशासनाने सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची सूचना केली. निविदेमध्ये समाविष्ठ बाबींप्रमाणे सर्व कामे हि गुणवत्तापूर्ण प्रमाणित सामुग्री व संसाधनांचा वापर करून पूर्ण करण्यात याव्या. कंत्राटदारांनी मुदतीत काम करणे गरजेचे असल्याने त्याबाबत अधिकृतपणे करारनामा करण्यात यावा, अमृत -२ हि योजना अमरावती करांना आगामी काळात ५० वर्षापर्यंत पाणी पुरवठा करणारी आहे, हि सदोष नसली पाहिजे याकरिता योजनेच्या सर्व कामांच्या गुणवत्तेला घेऊन तज्ज्ञ व्यक्तीची त्रयस्थ समिती करून निरीक्षण (थर्ड पार्टी इंस्पेक्षण ) करून सदर काम सदोष होता कामा नये,याची सर्वानी खबरदारी , दक्षता व आपली जबाबदारी बाळगण्याचे आवाहन सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. ज्या ठिकाणी जलकुंभ साकारण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्या संदर्भात जिल्हा प्रशासन स्तरावर चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी स्पष्ट केले. अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योज़ना साठी कुठलाही निधी कमी पडू देणार असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने देण्यात आली.
या बैठकीला आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, यश खोडके,मजीप्राचे कार्यकारी अभियंता -विवेक सोळंके, उपविभागीय अभियंता संजय लेवरकर, शाखा अभियंता शिवहरी कुलट, मनोज वाकेकर , उपकार्यकारी अभियंता अतुल काटे , शाखा अभियंता मोरेश्वर आजने, सहायक अभियंता श्रेणी २ गुरुदत्त अविनाशे, सहायक अधीक्षक अभियंता सायकुंडे, स्नेहल राऊत, आदींसह मजीप्राचे अभियंता तसेच सर्व सहकारी उपस्थित होते.
अमृत -२ अमरावती शहर भुयारी गटार योजनेच्या कामांवर मंथन
अमृत टप्पा-१ मध्ये महापालिकेचा स्वनिधी प्राप्त न झाल्याने ही योजना बारगळली आहे. मागील अमृत टप्पा-१ अंतर्गत रखडलेल्या अमरावती शहर भुयारी गटार योजनेची कामे आता केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा-२ च्या १,७१८ कोटींच्या सुधारित कृती आराखडा मध्ये समाविष्ठ करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ज्याप्रमाणे अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा मंजूर करून आणली. आगामी काळात अमृत टप्पा -२ अमरावती भुयारी गटार योजनेच्या १,७१८ कोटींच्या प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार महोदयांनी बैठकीत सांगितले. अमृत -२ अभियान अंतर्गत भुयारी गटार योजना ही अमरावती महानगर पालिकेच्या स्वहिस्यातून कार्यन्वित करणे शक्य नाही. त्यामुळे अमृत -२ वाढीव पाणी पुरवठा योजनेप्रमाणेच केंद्र सरकार ,राज्य शासन व मजीप्रा असा योजनेचा वित्तीय आकृतीबंध करून प्रत्येकी ३३ टक्के वाट्यातून अमरावती भुयारी गटार योजना प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास आणावा लागणार आहे. व मजीप्राला सुद्धा शासनाकडूनच निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून अमृत-२ अमरावती भुयारी गटार योजना नजीकच्या काळात पुरेपुरपणे अंमलात आणण्यात येईल. तसेच सदर अमृत -२ योजना अमरावती शहराची संभाव्य पुढील ३० वर्षाची वाढ गृहीत धरून सन २०५४ पर्यंत या वर्षाकरिता संकल्पित करण्याबाबत सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने मजीप्रा प्रशासनाला सूचना देण्यात आली.