बिबट्या आला अंगावर बैलाने घेतले शिंगावर

वेणेगाव / विशेष प्रतिनिधी
शिकारी साठी आलेल्या बिबट्याला बैलांनी प्रतिकार करत पळवून लावल्याचा भयंकर प्रकार उजेडात आला आहे. या प्रतिकारात एका बैलाचे शिंगाडे असून तो रक्तबंबाळ झाला आहे. एकीकडे बैलांनी दिलेल्या कडव्या झुंजीचे कौतुक होत आहेत तर शेतकरी आणि गावकऱ्यात बिबट्याला घेऊन दहशत माजली आहे. बैलांनी केलेला प्रतिकार आणि शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
खालची पिलाणी, ता. सातारा परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.
खालची पिलाणी येथील सरपंच जयवंत कदम यांचे वडील बळीराम कदम हे शनिवारी सकाळी डोंगरात दोन बैल चरावयास घेऊन गेले होते. अकरा वाजण्याच्या सुमारास बैल चरत असताना ते झाडाखाली विश्रांतीस बसले होते. यावेळी काही अंतरावर विपरीत घडत असल्याची चाहूल त्यांना लागली. कसला तरी भेदरणारा आवाज त्यांच्या कानी पडला. लांबूनच त्यांनी कानोसा घेतला तर त्यांचे दोन्ही बैल व बिबट्याचीझुंज सुरु असल्याचे दिसले.
बिबट्या चवताळून बैलांवर हल्ला करत होता. त्याचवेळी दोन्ही बैलही त्याला कडवा प्रतिकार करत हल्ला परतवून लावत होते. त्यांच्यामध्ये जोरदार झुंज सुरु होती. त्वेशाने ते एकमेकांवर धावून जात होते. या झुंजीत राजा बैलाचे एक शिंग तुटले. ‘राजा’ रक्ताने माखला.
त्याच्या शरिरावरही बिबट्याच्या नख्यांमुळे गंभीर जखमा झाल्या. बिबट्या पुन्हा पुन्हा मागे फिरुन राजा बैलावर हल्ला करत असतानाच हा थरारक प्रसंग दुरुन पाहणार्या शेतकर्यांनी आरडाओरडा केला. शेतकर्यांच्या आरडाओरडीमुळे आणि बैलांच्या प्रतिकारामुळे अखेर बिबट्या पळून गेला. परंतु तोपर्यंत राजा बैलाच्या पाठीवर खोल जखमा झाल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच सातारा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भूषण गावंडे, संभाजी दहिफळे, पोलीस पाटील सत्यवान मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी बैलाची माहिती घेत पंचनामा केला. बिबट्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत खालची पिलानी येथे बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात संपत कदम यांची गाय ठार झाली होती. बिबट्याने गावातील अनेक कुत्री फस्त केली आहेत. बैलावर हल्ला होणे ही या परिसरातील मोठी घटना असून यापुढे मानवी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.




