मानले रे भावा….महिलेला वाचवण्यासाठी त्याने घेतली १४० फुटांवरून उडी

कऱ्हाड / विशेष प्रतिनिधी
तसा तो पुण्याच्या पण एका गॅस कंपनीत कामाला असल्याने तो गॅस सिलेंडर ची गाडी चालवत होता. त्यानिमित्ताने सिलेंडर चे वाटप करण्यासाठी तो कऱ्हाडाला आला होता. यावेळी त्याने जे पाहिले ते पाहून त्याने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता १४० फुटांवरून थेट नदी पात्रात उडी घेतली. आणि एका महिलेचे प्राण वाचवले.बी
स्थानिक पाच ते सहा युवकांची त्याला मदत झाल्याने त्यांना नवविवाहितेचा जीव वाचविण्यात यश आले. अरुण ज्ञानदेव जाधव (वय ३०) असे या जिगरबाज युवकाचे नाव. जाधवच्या कृष्णा नदीपात्रातील धाडसाचा थरार अनेकांनी आज अनुभवला.
त्याच्यासोबत त्या नवविवाहितेला वाचवणाऱ्यांवरही उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला. कृष्णा नदीपात्रात दुपारी दीड ते दोनपर्यंत हा थरार सुरू होता. पोलिसही वेळीच पोहोचले. नवविवाहिता शुद्धीवर आली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अरुण जाधव नेहमीप्रमाणे त्याच्या गॅस सिलिंडरची डिलिव्हरी देण्यासाठी पुण्याहून कऱ्हाडला आला होता. डिलिव्हरी देऊन तो पुन्हा निघाला असता त्याचे वाहन कृष्णा नदीच्या पुलावर आले. त्यावेळी पुलावर बघ्यांची गर्दी होती. सर्वांच्या नजरा नदीपात्राकडे लागल्या होत्या. ते पाहून त्यानेही वाहन थांबवले. काय झाले, ते पाहण्यासाठी पुलावरून नदीपात्रात पाहिले. त्यावेळी नवविवाहितेने नदीत उडी मारून काही क्षणच झाले होते. जाधवला त्या महिलेची पाण्यात जगण्यासाठीची हालचाल दिसली.
अरुणने त्या महिलेला वाचवण्यासाठी अंगावरील कपड्यासह नदीपात्रात उडी घेतली. जाधवने सुमारे १४० फुटांवरून उडी मारून महिलेला वाचविण्यासाठी केलेले धाडस पाहून सारेच अवाक् झाले. त्याची उडी त्या महिलेच्या शेजारीच पडली. तिला वाचवण्यासाठी त्याने कसब पणाला लावले. तिच्या केसांना पकडून ठेवले. जाधवपाठोपाठ नदीपात्रात त्याच्या मदतीसाठी सागर पाटीलने (रा. रैनाक गल्ली, कऱ्हाड) धाडसाने धाव घेतली. तो पट्टीचा पोहणारा आहे. त्या दोघांनी त्या महिलेला नदीकाठापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले.
त्यावेळी त्यांच्या प्रयत्नाला आणखी काही युवकांनी साथ दिली. महिलेला वाचविण्यासाठी त्या दोघांबसोबतच गोपाळ निलजकर, प्रेम ओहाळ, पवन जावळे, योगेश राजोळे, भारत जावळे व कुमार जावळे हेही पोहत नदीपात्रात गेले. त्यांचीही मदत महत्त्वाची ठरली. या सर्व युवकांच्या प्रयत्नाने महिलेला नदीकाठाला आणण्यात यश आले. तिच्या शरीरातील पाणी बाहेर काढण्यात आले. सर्वांच्या प्रयत्नाने या नवविवाहितेचे प्राण वाचले. ते समजताच जाधवसह सर्व युवकांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्या महिलेला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शुद्धीवर आल्याने ती धोक्याच्या बाहेर होती. तिने तिचे नाव व पत्ता कर्मचाऱ्यांना सांगितला. तिच्यावर उपचार सुरू होते.
वाचविणाऱ्यांवरही उपचार
संबंधित नवविवाहितेला वाचविल्यानंतर जाधव निघूनही गेला. मात्र, काही लोकांनी त्याला पाहिले होते. त्याचा मोबाईल क्रमांकही एकाने घेतला होता. त्यामुळे त्याला पुन्हा कॉटेजला उपचारासाठी बोलविण्यात आले. जाधवही तेथे आला. त्याच्यावरही उपचार करण्यात आले. त्याच्यासोबत महिलेचे प्राण वाचविण्यासाठी नदीपात्रात गेलेला युवक सागर पाटील याच्याही पाठीत कळ मारत होती. त्याच्या पायाला काच लागली. त्यावरही उपचार केले.
नदीपात्रात महिला बुडत असल्याचे पाहून राहवले नाही. तिला वाचवण्यासाठीच कपड्यासह उडी मारली. तिचे प्राण वाचविण्यासाठी स्थानिक युवकांचीही मदत झाली. सगळ्यांच्या प्रयत्नाने त्या महिलेचे प्राण वाचले, हे महत्त्वाचे आहे. मला पोहता येते, त्याचा कोणाला तरी फायदा झाला, त्याचे समाधान आहे.
– अरुण जाधव, पुणे




