राष्ट्रीय
टॅटू काढायला गेली आणि HIV घेऊन बसली

नवी दिल्ली /विशेष प्रतिनिधीं
आपण ती म्हण नक्कीच ऐकली असेल की ‘ करायला गेले काय ,आणि उलटे झाले पाय ‘ याची प्रचिती एका महिलेला आली आहे. तिने टॅटू काढला.काही दिवसानंतर तिची प्रकृती ढासळायला लागली. तिने चेक अप केले असता तिला HIV ची लागण झाल्याचे उघड झाले.आता तिच्यावर रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत.
दिल्लीतील एका टॅटू पार्लरमध्ये टॅटू काढल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच एका 32 वर्षीय महिलेची प्रकृती खालावली आणि वैद्यकीय तपासणीत ती HIV पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. टॅटू काढताना वापरण्यात आलेली सुई दूषित किंवा व्यवस्थित निर्जंतुक न केल्यामुळे हा संसर्ग झाला असावा, असा तीव्र संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
गुप्तांगात गंभीर इन्फेक्शन झाल्याने पोहोचली रुग्णालय
पीडित महिला कानपूर येथील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वी ती कानपूरच्या प्रसिद्ध ‘गणेश शंकर विद्यार्थी स्मारक’ (GSVM) मेडिकल कॉलेजच्या चर्मरोग विभागात उपचार घेण्यासाठी आली होती. तिला गुप्तांगात गंभीर संसर्ग झाल्याची तक्रार होती. तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर तात्काळ तिची HIV आणि हेपेटाइटिस-बी चाचणी करण्याचा सल्ला दिला. या चाचण्यांचे अहवाल आले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण त्यात महिला HIV बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या चर्मरोग विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्वेतांक यांनी सांगितले की, “पीडित महिलेने रुग्णालयात येण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी दिल्लीतील एका पार्लरमध्ये टॅटू काढला होता. त्यानंतर तिला हा गंभीर संसर्ग झाला. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, टॅटूसाठी वापरलेली सुई दूषित असल्यानेच तिला हा आजार झाला असावा, मात्र मूळ स्रोताची पुष्टी करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.” टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
शासकीय रुग्णालयात मोफत ‘ART’ उपचार सुरू
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीडित महिलेची शासकीय रुग्णालयातील अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (ART) सेंटरमध्ये नोंदणी करण्यात आली असून, तिच्यावर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, HIV वर कोणताही कायमस्वरूपी किंवा पूर्ण बरा करणारा इलाज उपलब्ध नाही. मात्र, योग्य उपचारांच्या आणि नियमित औषधोपचारांच्या मदतीने हा आजार प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो, ज्यामुळे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. यासाठी रुग्णाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात.
अस्वच्छ टॅटू पार्लर आणि रंगीत शाईबाबत डॉक्टरांचा गंभीर इशारा
अस्वच्छ किंवा अनधिकृत ठिकाणी टॅटू काढणे टाळावे. दूषित सुयांच्या वापरामुळे HIV आणि हेपेटाइटिस-बी सारख्या रक्ताद्वारे पसरणाऱ्या गंभीर संसर्गाचा धोका थेट निर्माण होतो. टॅटूबरोबरच त्यासाठी वापरण्यात येणारी रंगीत शाई देखील त्वचेच्या विविध आजारांना कारणीभूत ठरू शकते. यामुळे शरीरात ‘फॉरेन-बॉडी रिएक्शन्स’ आणि ग्रॅन्युलोमॅटस सारखे आजार होऊ शकतात.
विशेषतः लाल आणि हिरव्या रंगाच्या टॅटू शाईमुळे त्वचेवर अॅलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्वचेवर अत्यंत वेदनादायक आणि तीव्र खाज सुटणारे लाल रहे येऊ शकतात. त्यामुळे टॅटू काढताना पार्लरमधील स्वच्छता आणि वापरली जाणारी सुई अगदी नवीन आणि निर्जंतुक आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1


