तब्बल दीड महिन्यानंतर सहाय्यक सचिवांच्या दालनाची तुटली सिल
कृउबास लाखांदूरची घटना : शनिवारच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची शक्यता ?
भंडारा / शमीम आकबानी
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर बाजार समितीमध्ये कार्यरत संचालकांच्या बैठकीत लेखापरीक्षण अहवाल दडपण्यासह विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून दीड महिन्यापूर्वी बाजार समितीच्या सहाय्यक सचिवाच्या दालनाला सील ठोकण्यात आली होती. मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर शनिवारी (दि.28 सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीच्या सहाय्यक सचिवाच्या दालनाला लावलेले सील बाजार समितीचे सभापती व इतर संचालक, उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तोडण्यात आले. ही कारवाई लाखांदूर येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि.27 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता करण्यात आली आहे.
माहितीनुसार सन २०२१-२२ व २०२२-२३ या कालावधीत लाखांदूर येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून धानाची खरेदीही करण्यात आली.
परंतु , सदर खरेदी अंतर्गत तत्कालीन बाजार समिती प्रशासनाने शासनाच्या सन २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालात कोट्यवधी रुपयांचा धान घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला होता. मात्र याप्रकरणी बाजार समितीचे सहायक सचिव यांनी 8 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकीत लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु सचिवांनी सदर अहवाल जाणीवपूर्वक दडपून संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य संचालकांनी शासनाकडून प्राप्त लेखापरीक्षण अहवाल दडपल्याच्या आरोपावरून 14 ऑगस्ट रोजी संचालकांची आवश्यक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला सहाय्यक सचिव जाणीवपूर्वक गैरहजर असल्याचा आरोप करत दीड महिन्यापूर्वी सहायक सचिवांच्या दालनाला लावलेले सील लावण्यात आला होता.
दरम्यान,शनिवारी (दि.28 सप्टेंबर) बाजार समिती अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी आवश्यक कार्यवाही पुस्तक व इतर नोंदी आवश्यक असल्याने शुक्रवारी (दि.27 सप्टेंबर) बाजार समितीचे सभापती, उपाध्यक्ष व काही संचालकांच्या उपस्थितीत सहायक सचिवांच्या दालनाचे सील तोडण्यात आले.
या वेळी बाजार समितीचे विद्यमान सभापती, उपसभापती, संचालक व इतर कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून आवश्यक नोंदी सर्वसाधारण सभेसाठी उपलब्ध करून दिल्या, मात्र गेल्या दीड महिन्यापासून विरोधी संचालकांनी सहाय्यक सचिवांच्या दालनाला लावण्यात आलेले सील तोडताना वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.28 सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.