पत्रकारावर गुन्हा दाखल ; आम आदमी पार्टी तर्फे निषेध
नागपूर / अमित वानखडे
पत्रकार श्री विनय पांडे यांच्याविरोधात नागपूर महानगरपालिकेने गुन्हा दाखल करण्याच्या प्रकाराचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करते. महानगरपालिकेची ही कृती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. पत्रकार, व्यंगचित्रकार, कलाकार किंवा कुठल्याही सामान्य नागरिकास समाजातील उणिवा, चूका यांवर बोट ठेवण्याचा व त्याविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार आहे. जेव्हा समाजातील जबाबदार नागरीकांकडून अशा प्रकारची टीका होते तेव्हा त्यामागचा उद्देश समजून घेणे गरजेचे असते. शासन-प्रशासनात काम करणार्या व्यक्ती या लोकांप्रती उत्तरदायी असतात. त्यामुळे नागरीकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार किंवा त्यांच्याकडून होणारी टीका ही व्यक्तीगत स्वरुपात न घेता खिलाडूवृत्तीने स्विकारायला हवी. हे प्रकरण हाताळतांना नागपूर महानगरपालिकेने जी तत्परता दाखवली तशीच तत्परता जनहिताच्या कामांसाठी दाखवायला हवी. मनपा आयुक्त राधाकृष्णन हे संवेदनशील व कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून अशा पद्धतीची कृती अपेक्षित नाही. आयुक्तांनी आपल्या सभोवताल जे अव्यावसायिक तथाकथित सल्लागार नेमले आहेत ते बदलण्याची गरज आहे. या प्रकरणी संवेदनशीलपणे फेरविचार करुन ही तक्रार मागे घ्यावी जेणेकरुन नागरीकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिल. नागरीकांचे फ्रीडम आफ स्पीच कायम रहावे यासाठी आम आदमी पार्टी सदैव कटीबद्ध आहे.*
*अभिजीत झा*
*संयोजक, आम आदमी पार्टी, पश्चिम**नागपूर*