राजेश्वर युनियन हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा!

• प्रश्नमंजुषा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन; १२२ विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रतिनिधी :- पवन इंगोले
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, बडनेरा द्वारा संचालित राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मूलभूत हक्क व कर्तव्यांची माहिती तसेच लोकशाही मूल्यांविषयी जनजागृती करण्यात आली. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सत्येन राघोर्ते होते. प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापिका मनीषा राऊत, पर्यवेक्षिका नीलिमा कांडलकर, पर्यवेक्षक प्रमोद पारवे, ज्येष्ठ शिक्षिका अनिता मुगल, शिक्षक सुधीर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्त्या हेमलता भगत यांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आदर राखून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी शिक्षिका मेघा उपाध्ये व शिक्षक किशोर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू कुलातील वंश पोटे, संपदा खरतडे व सोहम भालेराव यांनी प्रथम, तर सरदार वल्लभभाई पटेल कुलातील लक्ष क्षीरसागर, आस्था वैद्य व सार्थक बोबडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण शिक्षक आदेश मोहोड व अतुल ठाकरे यांनी केले.
कलाशिक्षक मोतीराम सैरीसे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच वक्तृत्व स्पर्धेत सोनल सोनवणे व आस्था वैद्य यांनी सहभाग नोंदवून क्रमांक मिळविला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सत्येन राघोर्ते यांनी सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशी मेटे हिने केले. सूत्रसंचालन पूर्वी जाधव हिने, तर आभार प्रदर्शन मनस्वी अंबाडकर हिने केले. दुपार विभागात शिक्षक संदीप अंबाडकर व सकाळ विभागात शिक्षक मोहन खानंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.