क्राइम

सलमान ने भररस्त्यातून तरुणीला उचलून हॉटेल मध्ये नेले

Spread the love
मेरठ /विशेष प्रतिनिधी
            मेरठ मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एका मुस्लिम तरुणाकडून भररस्त्यातून तरुणीला हॉटेल मध्ये ओढत नेले. सलमान नामक तरुण पिडीत तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने उचलत नेत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत तरुणी ‘ मला वाचवा ‘ अशी विनवणी करतांना दिसत आहे. तर सलमान हा तरुणीला बळजबरीने उचलून नेत असल्याचे आणि तिला रस्त्यावर आपटत असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे.

मेरठमधील एका हॉटेलमध्ये 24 वर्षीय तरुणीला कथितरीत्या ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तरुणी आपली सुटका करुन रस्त्यावर आली असताना, नाट्यमय घडामोडी घडल्या. रस्त्यावर घडलेला हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी सदर बाजार परिसरातील हॉटेलमधून बाहेर पडताना तरुणी ‘मला वाचवा’ अशी ओरडत मदतीसाठी विनवणी करत होती. यावेळी सलमान नावाच्या एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला, तिला पकडून खाली आपटले आणि पुन्हा ओढत हॉटेलच्या आत नेले. पोलीस कारवाई करत असताना आरोपी सलमानने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो पुलावरून खाली पडला, त्यानंतर बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

तरुणी रस्त्यावर ओरडत सुटल्याने आजुबाजूचे दुकानदार आणि लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. यामधील काहीजणांनी तिला वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी लोकांना आतमध्ये येण्यापासून रोखलं. दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्यानंतर सलमान छतावर चढला आणि उडी मारुन पळून गेला. पोलिसांनी हॉटेल सील केलं असून, सलमानच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे.

पीडित तरुणी गाझियाबादची रहिवासी आहे. तिने सलमान मेरठमधील कांकेरखेरा परिसरातील रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. तिने आरोप केला की, सलमानने तिला सोमवारपासून हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं आणि संधी मिळताच ती तिथून पळून आली. तिने असाही आरोप केला की, सलमानने हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि लग्नासाठी दबाव टाकला.

सदर कॅंट सर्कल ऑफिसर संजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने ती सलमानला गेल्या अडीच वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं आहे. गुप्ता यांच्या माहितीनुसार, दोघेही हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्यात वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी तरुणीची सुटका करून तिला पोलीस ठाण्यात नेले, जिथे तिने लेखी तक्रार दाखल केली.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमानवर तिला डांबून ठेवल्याचा, मारहाण केल्याचा आणि बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत हॉटेल कर्मचाऱ्यांची काही भूमिका होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सलमानला कसे अटक केले?

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी एका खबऱ्याकडून त्यांना सलमान नरारहेड गावाजवळ बांधकामाधीन असलेल्या एका अंडरपासच्या परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तो परिसर वेढला असता, सलमानने त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, पळून जाण्याच्या प्रयत्नात तो जवळच्या पुलावर चढला, परंतु त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. या घटनेत त्याच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

‘लव्ह जिहाद’चा दावा

अखिल भारतीय हिंदू सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन सिरोही यांनी मंगळवारी हॉटेलला भेट दिली आणि पोलिसांना सतर्क केले. त्यांनी या घटनेचे वर्णन ‘लव्ह जिहाद’ असं केलं आणि असा दावा केला की, तरुणीचं लग्न दुसऱ्या पुरुषाशी ठरत असल्याचे समजल्यावर सलमानने तिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. सिरोही यांनी असाही आरोप केला की, जर तिने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं, तर तिला मारून टाकण्याची धमकी सलमानने दिली होती. त्यांनी असाही दावा केला की, हॉटेलने त्यांची ओळख पटवणारे तपशील न घेताच रुम दिली होती.

मात्र, पोलिसांनी हा दोघांमधील वाद आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीचे प्रकरण असे केले असून, यात कोणताही धार्मिक हेतू नसल्याचं म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close