एआरटीओ हेमंत हेमाडे यांच्या आत्महत्येला घेऊन पत्नीने केला धक्कादायक खुलासा

नाशिक / क्राईम रिपोर्टर
नाशिकमधील सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) हेमंत हेमाडे यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याच्या घटनेनंतर आता या प्रकरणात अत्यंत खळबळजनक वळण आले आहे.
या घटनेनंतर हेमाडे यांच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत धक्कादायक तक्रार नोंदवली आहे.
मालमत्तेच्या वादातून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप करत पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलगा, मुलगी, सून आणि मुलाच्या सासऱ्याविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त करणे आणि धमकी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हेमाडे यांचा मुलगा आणि मुलाचे सासरे या दोघांना अटक केली आहे.
हेमाडे यांच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून छळाची गंभीर हकिगत समोर आली आहे. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, सावत्र मुलगा आणि मुलाचे सासरे हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून मालमत्तेच्या वादातून हेमंत हेमाडे यांच्याशी सातत्याने वाद घालत होते. तसेच त्यांना मारहाण आणि अश्लील शब्दांत शिवीगाळ करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मालमत्तेवरील हक्क सोडण्यासाठी तसेच न्यायालयीन दावे मागे घेण्यासाठी हेमाडे यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता.
“न्यायालयात सुनावणीसाठी पुन्हा हजर राहिल्यास ती शेवटची तारीख ठरेल” अशी थेट जीवे मारण्याची धमकी आरोपींकडून पतीला देण्यात आल्याचे पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. या सततच्या त्रासामुळे सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने हेमाडे यांच्यासमोर जीवन संपवल्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर गंगापूर पोलिसांनी हेमंत हेमाडे यांचा मुलगा यश हेमाडे सून भाग्यश्री हेमाडे मुलगी प्रियंका खोपकर आणि व्याही मल्लिकार्जुन उमदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी यश हेमाडे आणि मल्लिकार्जुन उमदी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




