विदेश
विद्यापीठात तरुणीवर सामूहिक बलात्कार

शिकागो / नवप्रहार डेस्क
भारतात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेनंतर महिला भारतात सुरक्षित नसल्याची ओरड होत आहे. पण महिला अमेरिका सारख्या प्रगत देशात सुद्धा सुरक्षित नसल्याचे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून समोर आले आहे.
एका फॅटर्निटी हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक हिंसाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, शिकागो विद्यापीठाच्या फॅटर्निटी हाऊसच्या बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.
तसंच यावेळी काही तरुण बाहेर उभे राहून “माझी पाळी कधी?” आणि “मला आत येऊ द्या” असे ओरडत होते असेही तिने सांगितले.
अमेरिकेतील प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च मानांकित संशोधन संस्था असलेल्या शिकागो विद्यापीठाने या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. या विद्यापीठात एकूण 18 हजार विद्यार्थी आहेत. रविवारी पहाटे अल्फा एप्सिलॉन पाय (Alpha Epsilon Pi) फॅटर्निटी हाऊसमध्ये पार्टीदरम्यान 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठाने पीडित तरुणी विद्यार्थिनी नसल्याचं म्हटलं आहे. तसंच, एका दुसऱ्या व्यक्तीने आरोपीला हटकल्यानंतर तो घरातून पळून गेला, असेही विद्यापीठाने सांगितले.
शिकागो पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही आरोपी करण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी एक सूचना जारी करून कळवले आहे की, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली.
नेमके आरोप काय आहेत?
फॅटच्या इंस्टाग्रामला पार्टीची जाहिरात पाहिल्यानंतर मी माझी मैत्रीण लारा आणि आणखी एका मैत्रिणीसोबत तिथे गेले होते असं पीडित तरुणीने सांगितले
‘शिकागो सन-टाइम्स’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने पार्टीमध्ये मद्यपान केले आणि नाचत होती. यानंतर काही वेळातच तिला अस्वस्थ वाटू लागले होते. नंतर तिच्या दोन मैत्रिणींना ती एका बाथरूममध्ये एका तरुणासोबत आढळली. यावेळी तिला अजिबात शुद्ध नव्हती. तसंच त्यांच्या अंगावरील कपडेही बऱ्यापैकी काढलेले होते. सन-टाइम्स’च्या वृत्तानुसार, त्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले की, बाथरूममध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांना बाजूला सारून बळजबरीने आत जावे लागले. हे पुरुष तिथे आनंद व्यक्त करत होते आणि जणू काही आत सुरू असलेल्या प्रकाराला प्रोत्साहन देत होते.
‘न्यूयॉर्क पोस्ट’शी बोलताना लाराने सांगितले की, मैत्रिणीचा शोध घेत असताना तिला तळघरातील एका बंद बाथरूमच्या दाराबाहेर काही तरुणांची हालचाल दिसली. हे तरुण जोरजोरात ओरडत होते. हे लोक माझी पाळी कधी येणार? आणि “मला आत जायचे आहे,” अशी विधाने करत होते.
तिने सांगितले की, तिने कसेबसे बाथरूमचे दार उघडले. आतमध्ये तरुणी भिंतीला टेकून बसलेली होती; तिचे कपडे काढलेले होते आणि अंतर्वस्त्रे खाली ओढलेली होती. पीडित तरुणी “हे थांबवा” आणि “मला इथून बाहेर काढा” असे ओरडत होती.
लाराने दावा केला की, तिने त्या तरुणांचा ‘फ्रेंट हाऊस’च्या (विद्यार्थी संघटनेच्या निवासस्थाना) बाहेर पाठलाग केला आणि त्यांच्यावर आपल्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी कथितरीत्या “तिलाच हे हवे होते.” असे उत्तर दिले.


