मित्रांचे लाजिरवाणे कृत्य ; मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार

विशेष प्रतिनिधी / विरार
महाराष्ट्राची राजधानी मुंबईनजीक असलेल्या विरार परिसरातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं दोन नराधमांनी आपल्या मित्राच्याच पत्नीवर सामूहिक अत्याचार केला आहे.पती घरी नसताना आरोपींनी अचानक घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी पीडितेच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज यादव आणि विशाल असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा नोंदवताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मैत्रीच्या नात्याचा घेतला गैरफायदा
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सूरज यादव हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्याचं अनेकदा घरी येणं जाणं होतं. गेल्या पाच वर्षांपासून पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळख होती. ८ तारखेला महिलेचा पती घरी नसताना सूरज यादव हा विशाल नावाच्या आपल्या अन्य एका मित्रासोबत महिलेच्या घरी गेला.
यावेळी पीडितेच्या चार वर्षांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज यादव आणि विशाल या दोघांना अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.




