क्राइम

तृतीयपंथीयावर धर्मांतरासाठी दबाव, मारहाण करून घरातील 6 लाख 70 हजार लुटले

Spread the love

नऊ तृतीयपंत्रियावरोधात गुन्हा दाखल 

पुणे /विशेष प्रतिनिधी 

 तृतीयपंथीयावर कथितपणे धर्मांतरासाठी दबाव आणून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. तृतीयपंथीयाला धमकावून त्याच्या घरातील सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याचाही आरोप असून, याप्रकरणी नऊ तृतीयपंथींविरुद्ध धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत दाखल फिर्यादीनुसार, नऊ तृतीयपंथीयांविरुद्ध दरोडा, धमकाविणे, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमन २०२६ मधील कलमे, तसेच तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तृतीयपंथीय कोथरूड परिसरातील एका मंदिराजवळ राहायला आहे. गेल्या २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेले नऊ तृतीयपंथी त्याच्या घरात शिरले. त्यांनी त्याच्या धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य केले. ‘तू हा धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार कर,’ अशी धमकी दिली. फिर्यादी तृतीयपंथीयाला पट्टा, बांबूने मारहाण केली.

तसेच, भिक्षेतील ५० टक्के वाटा न दिल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. आराेपींनी त्याला धमकावून घरातील सहा लाख ७० हजारांची रोकड लुटली, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.

पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

मारहाणीची तक्रार पोलिसांकडे देण्यासाठी निघालेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना पर्वती दर्शन परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. वैभव गणेश वेदपाठक (वय १८, रा. गल्ली क्रमांक ३७, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत नीलेश चंद्रकांत धुमक (वय ३०, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा ) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदपाठक आणि धुमक शेजारी आहेत. नीलेश शुक्रवारी (९ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास घरी जेवण करत होता. त्या वेळी त्याचा वडिलांशी वाद झाला. आरोपी वैभव तेथे आला. तुमच्या भांडणामुळे त्रास होतो, असे त्याने सांगितले. वैभवने नीलेशला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर नीलेश पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी निघाला.

पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी निघालेल्या नीलेशला आरोपीने अडवले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत नीलेश गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाला. जखमी अवस्थेतील नीलेश पोलीस चौकीत गेला. त्याने याबाबतची तक्रार दिली. पसार झालेला आरोपी वैभव याला पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close