आजोबांच निघाले नातवाचे मारेकरी

परवानाधारक रायफल ने गोळी झाडून केली हत्या
पुणे /विशेष प्रतिनिधी
लोणावळा येथे घडलेल्या अभय माणिक मराठे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरवातीला अनवधानाने रायफलीतून गोळी सुटल्याने अभय याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात वाटत होते.पण पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये गोळीची दिशा सांगण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी सखोल तपास केला असता वेगळेच सत्य बाहेर आले. अभय चे आजोबा यांनीच आपल्या परवाना धारक रायफलमधून अभय वर गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मारेकरी 83 वर्षाच्या आजोबांना अटक केली आहे.
पोलिसांच्या सखोल तपासानंतर हा अपघात नसून कौटुंबिक वादातून झालेला खून असल्याचे उघड झाले आहे. अभय मराठे हे लोणावळ्यातील माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे सुपुत्र होते. 5 ऑक्टोबर रोजी भुशी गावातील हॉटेल मोतीराम परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अभय यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेच्या सुरुवातीला लोणावळा शहर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. परंतु शवविच्छेदन अहवालातील काही बाबी आणि गोळी लागण्याची दिशा यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी सुरू केली.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासात मूळ सत्य समोर आले. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात गेल्या काही काळापासून मालमत्तेवरून तीव्र मतभेद सुरू होते. 5 ऑक्टोबर रोजी याच विषयावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या मोतीराम यांनी आपल्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्यावर थेट गोळी झाडली.
या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आजोबा मोतीराम मराठे यांना अटक केली आहे. तसेच, घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुटुंबातील इतर 5 जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपघाताचा आभास निर्माण करून दडपण्याचा प्रयत्न केलेला हा हत्येचा कट अखेर पोलिस तपासात उघडकीस आला आहे.




