तिहेरी हत्या प्रकरणात नवरा बायकोचा सहभाग , पोलिसांनी केली अटक

कोसंबा ( गुजरात)/ विशेष प्रतिनिधी
एका 70 वर्षीय वृद्धेच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावला आहे. विशेष म्हणजे या हत्येमागे पूर्वीच्या 2022 मध्ये आणखी दोन हत्येचा छडा लागला आहे. या तिन्ही मृत महिला एकमेकांच्या जवळच्या नातेवाईक होत्या. या हत्या नात आणि तिच्या पतीने केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या हत्या वृद्धेची नात उर्मिला आणि तिचा पती माधवदास यांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी माधवदासने पत्नी उर्मिलासोबत मिळून शांताबेन वसावा (वय 70) यांची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि मृतदेह घराच्या मागच्या अंगणात खड्डा खोडून गाडला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी माधवदासनेच पत्नीशी झालेल्या वादानंतर तिला व तिच्या एका मित्राला अडकवण्यासाठी पोलिसांत जाऊन हत्येची माहिती दिली होती.
‘असं’ बाहेर आलं प्रकरण
गुन्हे शाखेचे एसपी भरत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसंबा येथील वडफलिया भागात एकट्या राहणाऱ्या शांताबेन यांची हत्या केल्यानंतर आरोपी दांपत्य अहमदाबादच्या धोलका तालुक्यातील वालथेरा गावात राहू लागले होते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून कौटुंबिक वादानंतर दोघे वेगळे राहत होते. उर्मिला घरातील दागिने, रोकड आणि मुलाला घेऊन निघून गेल्यामुळे संतापलेल्या माधवदासने तिला व तिच्या चुलत भावाला अडकवण्यासाठी पोलिसांकडे हत्येची खोटी तक्रार केली. अहमदाबाद गुन्हे शाखेने या अर्जाची कसून चौकशी केली असता पोलिसांना संशय आला. सखोल चौकशीत माधवदासचा बनाव उघड झाला आणि त्याने स्वतःच पत्नीच्या साथीने शांताबेन यांची हत्या केल्याची कबुली दिली.
ड्रममध्ये मृतदेह वरुन सिमेंट
आरोपी दांपत्याने अत्यंत हुशारीने ही हत्या लपवली होती. कोरोनाच्या काळात रुग्णालयातून मृतदेह घरी न पाठवल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, त्यांनी शांताबेन यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार झाल्याची अफवा पसरवली. प्रत्यक्षात त्यांनी मृतदेह एका ड्रममध्ये ठेवून त्यात तीन पोती सिमेंट आणि पाणी भरून बंद केले. तीन महिन्यांनंतर संधी साधून त्यांनी तो ड्रम घराच्या अंगणात 4 ते 5 फूट खोल खड्डा खोडून पुरला आणि त्यावर सिमेंटचा जाड थर (स्लॅब) ओतला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सिमेंटचा थर फोडून आणि खड्डा खोडून शांताबेन यांचे अवशेष बाहेर काढले असून ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत.
इतर दोन हत्या कुणाच्या?
पोलिसांच्या अधिक तपासात या दांपत्याने आणखी दोन आजारी महिलांची हत्या केल्याची कबुली दिली, ज्यामुळे या ट्रिपल मर्डर केसचा छडा लागला. आरोपींनी उर्मिलाची बहीण भगवती वसावा, ज्या टीबीच्या आजाराने त्रस्त होत्या, त्यांचीही उशीने तोंड दाबून हत्या केली आणि मृतदेह गाडला. याशिवाय, माधवदासची आई आणि उर्मिलाची सासू मंजुळाबेन साधू, ज्यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) आजार होता, त्यांचीही अशाच प्रकारे उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. नंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौटुंबिक राग, संशय आणि आजारी नातेवाईकांचा भार हटवण्यासाठी आरोपींनी ही मालिका सुरू केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.




