वंदेमातरम ऐवजी हे राम बोलण्याची शिक्षकावर आली वेळ


सांगली / विशेष प्रतिनिधी
काल दिवसभर देशवासीयांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाहत होता. शाळा आणि कॉलेज मध्ये झेंडावंदन करण्यासाठी शिक्षक, प्रोफेसर आणि कर्मचाऱ्यांची सकाळ पासून लगबग सुरू होती. सांगलीतील शिराळा तालुक्यात मात्र स्वातंत्र्य दिनी दुःखद घटना घडली. मुलांना झेंडावंदनासाठी शिस्तीत उभ्या करणाऱ्या शिक्षकाला अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मनोहर शामराव कांबळे (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मनोहर कांबळे हे कोकरूड येथील मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर गावातील बाजारपेठेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी व्यासपीठावर स्वातंत्र्यगीत सादर करत होते. यावेळी कांबळे हे स्टेजसमोर उभ्या असलेल्या लहान मुलांना शिस्तीत उभे करत होते.
मुलांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या घरात नेले. त्यांना साखरपाणी देण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांना थोडे बरे वाटले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.




