बिबट्याने केली गायीची शिकार
वरुड / प्रतिनिधी
तालुक्यातील वाठोडा येथील शेतकर वासुदेव दतात्रय चौधरी यांच्या लिंगा वर्तुळात येत असलेल्या वाठोडा शेत शिवारातील शेतातील गोठ्याबाहेर तीन गायी व एक कालवड बांधल्या होत्या. गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बिबट्याने त्यातील एका ५ ते ६ वर्षांच्या गायीची शिकार केल्याची घटना दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघड झाली. शेतकरी गुरांना चारा- पाणी करण्यासाठी शेतात गेले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली.
तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांच्या मार्गदर्शनात एकदरा बिटचे वनरक्षक डी. के. वाघाडे व एक रोजंदारी मजुर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. वन्यप्राणी आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.