जगासाठी आनंदाची वार्ता ; रशियाने बनवली कँसर वर लस

रशिया / एनपी इंटरनॅशनल डेस्क
कँसर (कर्करोग )यामुळे कुठला एक देश नाही तर संपूर्ण जग ग्रस्त आहे. या आजाराने दरवर्षी प्रत्येक देशात अनेक लोकं दगावतात. अश्यातच रशिया तुन एक आनंदी वार्ता समोर आली आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, त्यांनी कर्करोगाची लस तयार केली आहे.
अशा परिस्थितीत ही बातमी संपूर्ण जगासाठी दिलासा देणारी आहे. रशियाचे म्हणणे आहे की, ते आपल्या सर्व नागरिकांना ही लस मोफत देणार आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली. रशियन आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी कर्करोगाविरूद्ध लस विकसित केली आहे, जी 2025 च्या सुरुवातीपासून रशियामधील कर्करोगाच्या रुग्णांना विनामूल्य दिली जाईल.
‘या’ लसीचे नाव अद्याप ठरलेले नाही
डेली मेलच्या बातमीनुसार, रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की, त्यांनी कर्करोगाची लस विकसित केली आहे. अहवालानुसार, ही लस कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी असेल. तथापि, ट्यूमर टाळण्यासाठी त्याचा वापर केला जाणार नाही. यापूर्वी, रशियाकडून आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, लसीचा प्रत्येक शॉट रुग्णासाठी स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आहे. पाश्चात्य देशांमध्येही अशीच लस (Vaccine) तयार केली जात आहे. रशियाने तयार केलेल्या लसीचे नाव अद्याप ठरलेले नाही.
रशियात कर्करोग रुग्णांची संख्या वाढतेय
उर्वरित जगाप्रमाणे रशियामध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. 2022 मध्ये रशियात कर्करोगाच्या रुग्णांची 635,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली. कोलन, स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग रशियामध्ये (Russia) सर्वात सामान्य असल्याचे म्हटले जाते.
इतर देशांमध्येही लस विकसित करण्याची शर्यत
रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने कर्करोगाच्या लसीच्या घोषणेची पुष्टी केली. ही लस कोणत्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी आहे किंवा या लसीला काय म्हटले जाईल हे सध्या स्पष्ट नाही. दुसरीकडे, 2023 मध्ये यू.के सरकारने वैयक्तिक कर्करोग उपचार विकसित करण्यासाठी जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीशी करार केला. याशिवाय, मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या सध्या त्वचेच्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत. आधीच बाजारात अशा लसी आहेत, ज्यांचे लक्ष्य कर्करोगास प्रतिबंध करणे आहे.