उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेवर कथित हकिमा कडून अत्याचार
उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेवर कथित हकिमा कडून अत्याचार
नाशिक / नवप्रहार डेस्क
पोटदुखीचा त्रास असल्याने एका कथित हकीमा कडे उपचारासाठी आलेल्या महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तक्रारी नंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हुसन यासीम शेख (३२, रा. मेहमुद नगर, वडाळागाव) असे संशयिताचे नाव आहे.
चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पीडित १९ वर्षीय विवाहितेला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यासाठी तिच्या माहेरी व नाशिकमधील सासरी डॉक्टरांकडे नेऊन उपचार केले. मात्र उपचारानंतरही तब्येत न सुधरल्याने विवाहितेच्या सासू व नणंद यांनी विवाहितेस वडाळा गावातील संशयित हुसन शेख याच्याकडे नेले. दरम्यान, हुसन हा परिसरात हकिम म्हणून वावरत होता. आयुर्वेदिक उपचार करत असल्याचे तो भासवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेस त्याच्याकडे नेल्यानंतर त्याने उपचार करण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली. तसेच शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजता पीडिता तिच्या नातलगांसोबत संशयिताकडे उपचारासाठी गेली असता त्याने नातलगांना बाहेर बसवले. तसेच पीडितेस घरात नेत तिला पावडरसदृष भुगा चाटण्यास देत तिच्या चेहऱ्यावर गुंगीकारक पावडरची फुंकर मारली. त्यामुळे पीडितेची शुद्ध हरपली. यानंतर संशयिताने विवाहितेवर अत्याचार केला.
ही बाब पीडितेस समजल्यानंतर तिने संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित हकीम हुसन शेख यास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि. ३) पोलिस कोठडी सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताविरोधात याआधीही एक गुन्हा दाखल असल्याचे समजते.
जादुटोणा कलम लावण्याची अंनिसची मागणी
संशयित हुसन शेख याने पीडितेच्या अंगात भूत असल्याचे सांगत भुतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा आणि या भोंदू बाबाने आजपर्यंत कोणाकोणाचे शोषण केले याचा शोध घ्यावा. संशयिताविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी डॉ. टी. आर. गोराने व महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.