सामाजिक

अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्या: डॉ राम लोकरे

Spread the love

वर्धा जिल्हा प्रतिनिधि
आशिष इझनकर

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची बैठक दिनांक 22 जून 2024 रोजी वर्धा येथे संपन्न झाली. सदर बैठकीस वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या. त्यात प्रामुख्याने श्री माधवराव पंडित, श्री नरेंद्रजी खरे, श्री अटलजी पांडे, श्री मकरंदजी उमळकर, श्री प्रफुल्लजी व्यास, श्री अमोलजी गाढवकर हे मान्यवर उपस्थित होते. वर्धा येथील ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री विलासजी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अमृतचे नागपूर विभागाचे समन्वयक श्री. देवदत्त पंडित यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून बैठकीचा हेतू विशद केला. अमृतच्या मुख्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राम लोकरे यांनी अमृतच्यां स्थापनेचा उद्देश सविस्तरपणे सांगितला. राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जाती ज्यांना कोणत्याही शासकीय विभाग / संस्था / महामंडळे यांचेकडून लाभ मिळत नाही त्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०२३ मध्ये अमृतने कौशल्य विकास प्रशिक्षणे, कृषी आधारित उद्योग व्यवसाय स्थापनेसाठी प्रशिक्षणे, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी अर्थसहाय्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अशा योजनांतून अमृतच्या लक्षित गटातील लाभार्थी यांना लाभ पोहोचवला असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी अमृतने आणखी अनेक योजना नव्याने सुरू केल्या आहेत. त्यात किशेर विकासापासून समाजातील विविध स्तरापर्यंत अमृत पोहोचणार आहे. या पूर्वी सुरू असलेल्या शैक्षणिक अर्थसहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहनपर योजना, कौशल्य विकास व कृषी आधारित उद्योग व्यतिरिक्त स्वयं रोजगार व उद्योगाभिमुख कौशल्य विकासासाठी १० वी उत्तीर्ण, आयटीआय ते पदवीधर विद्यार्थांसाठी तांत्रिक कौशल्य विकासासाठी इंडो जर्मन टूल रूम या संस्थेशी अमृतने सामंजस्य करार केला आहे. ज्या कोर्सेसना बाजारात मागणी आहे असे १५ निवासी कोर्स व ३० अनिवासी कोर्स यासाठी निवडले आहे. तेथे इच्छुक लाभार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व आवडीनुसार निवासी / अनिवासी प्रशिक्षणे देण्यात येतील. त्यासाठी शैक्षणिक शुल्क व निवास शुल्क अमृत देईल. त्याच धर्तीवर, संगणक क्षेत्रातील मान्यवर संस्था C-DAC यांचेकडून त्या क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षणे लाभार्थीना देण्याचे अमृत संस्थेने नियोजित केले आहे. कृषी क्षेत्रात व इतरत्र द्रोनचा वाढता वापर व त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची भूमिका विचारत घेता द्रोन वापराचे प्रशिक्षण राहुरी कृषी विद्यापीठाचे माध्यमातून देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षित द्रोण ऑपरेटर यांना केंद्र शासनाचे डीजीसीए चे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल व ते स्वतःचा व्यवसाय किंवा सेवा केंद्र सुरू करू शकतील. त्यासाठी प्रशिक्षण शुल्क व निवास खर्च अमृत करेल. या शिवाय ज्यांचेकदे उद्योग व्यवसायाच्या काही अभिनव कल्पना आहेत त्यांना विकसित करून नवोद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अमृतने बिझनेस इंक्यूबेशनची योजना आणली आहे. त्यात अशा नवोद्याजकांना तज्ञांचे सर्वांगीण मार्गदर्शन मिळेल. अशा उमेदवारास त्याच्या आकांक्षापूर्तीसाठी पूर्णवेळ प्रयत्नशील राहण्यासाठी अमृत तर्फे एक वर्ष फेलिशिप दिली जाईल. तज्ञांचे मार्गदर्शनसाठी अमृतने शासकीय अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विद्यापीठ यांचे सोबत सामंजस्य करार केला असून त्यात इतरही संस्थांचा अंतर्भाव केला जाईल.
या प्रशिक्षित कौशल्यधारक लाभार्थ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ जरुरीचे असते. त्यासाठी अमृतने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही योजना आणली आहे. त्यात रू.१५ लाख पर्यंत वैयक्तिक कर्ज मर्यादेत १२ टक्के कर्ज व्याज मर्यादेत व्याजाचा परतावा अमृत लाभार्थ्यांना देईल. हा व्याज परतावा तीन वर्षे कालावधी व उच्चतम मर्यादा रु. ४.५० लाख पर्यंत राहील. त्याच धर्तीवर लाभार्थी गटाने कर्ज घेतल्यास कर्ज मर्यादा रु ५० लाख व १२ टक्के मर्यादेत व्याज परतावा रक्कम रु. १५ लाख कालावधी ५ वर्षे अशी योजना सुरू केली आहे. यासाठी लाभार्थ्यांना कर्जाची परतफेड नियमितपणे बंधनकारक राहील.
अशाप्रकारे डॉ. लोकरे यांनी अमृतच्या सर्व योजनांची खुलासेवार माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्न व शंकांचे त्यांनी समाधान केले. उपस्थित सर्वांना त्यांनी अमृतच्या प्रचार व प्रसिध्दीच्या आवाहन केले व अमृतच्य लक्षित गटातील लाभार्थ्यांच्या विकासासाठी हातभार लावण्याची विनंती केली.
कार्यक्रमातील सर्व उपस्थितांनी डॉ लोकरे यांनी दिलेल्या माहिती बद्दल समाधान व्यक्त केले. श्री विलासजी कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व असेच माहितीपूर्ण कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close