सामाजिक
हा विजय फक्त आणि फक्त चांदुर वासीयांच्या एकजूटतेचा – जनता
अर्धे युद्ध जिंकले अर्धे अजून बाकी आहे
प्रकरण जबलपूर आणि कुर्ला एक्सप्रेस च्या थांब्याचे
चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
मागील काही काळापासून चांदुर वासीयांच्या रेल रोको समितीच्या आंदोलनाला अखेर यश आले असून रेल्वे विभागाने जबलपूर गाडीच्या थांब्याला मंजुरी दर्शवली आहे. या गोष्टीचे श्रेय फक्त आणि फक्त चांदुर वासीयांच्या एकजुट होऊन दिलेली लढ्याला जाते. सर्वपक्षीय नागरिकांच्या लढ्याचे श्रेय जर कोणी घेत असेल तर तो प्रकार म्हणजे ‘ साप गेल्यावर काठी ‘ आपटण्या सारखे आहे .

कोरोना नंतर बंद करण्यात आलेली कुर्ला – हावडा (18029 / 30 ) एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत सुरू करण्यात यावा आणि जबलपूर – अमरावती ( 11059/ 60) चा थांबा नव्याने सुरू करण्यात यावा यासाठी चांदुर रेल्वे येथील नागरिकांनी पक्षपात बाजूला सारून एकत्र येत रेल रोको कृती समितीची स्थापना करून हक्कासाठी लढाई सुरू केली होती .
रेल रोको कृती समितीच्या अलटी मेटम नंतर जागे झाले रेल्वे प्रशासन – कुर्ला आणि जबलपूर गाडीचा थांबा मिळावा यासाठी चांदुर वासीयांनी रेल रोको कृती समितीची स्थापना करत अत्यंत संयमाने आपला लढा सुरू ठेवला होता.निवेदन आणि मूक मोर्चाच्या माध्यमाने या समितीने आपली मागणी रेटून धरली होती. पण रेल्वे प्रशासनाकडून कुठलिही हालचाल होत नव्हती. शेवटी निद्रिस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी रेल रोको समितीने आंदोलन तीव्र करत रेल्वे रोखण्याचे अलटी मेटम दिले. त्यांनतर रेल्वे विभागाने जबलपूर थांब्याला मंजुरी दिली आहे.
हा विजय चांदुर येथील जनतेच्या एकजुटीचा – अमोल गवळी
मागील अनेक काळापासून रेल्वे च्या थांब्यासाठी और असलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आले आहे. रेल्वे प्रशासणाने जबलपूर गाडीचा थांबा मंजूर केला आहे. आणि कुर्ल्याच्या थांब्याचे आश्वासन दिले आहे. रेल्वे थांब्याला मिळालेले यश हा चांदुर वासीयांच्या एकजुटीचा विजय आहे. यापुढे देखील चांदुर वासीयां कडून अश्याच सहकार्याची अपेक्षा आहे.
आमच्या लढ्याचे श्रेय घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा – जनता
काही राजकीय लोकं या विजयाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण हा विजय म्हणजे चांदुर वासीयांच्या एकजूटतेचा विजय आहे. कारण ज्यावेळी आम्ही ही लढाई लढत होतो त्यावेळी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने रेल्वे विभागाशी संपर्क साधुन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही.आता सगळेच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीचे भांडवल करत आहे. हा प्रकार म्हणजे ‘ साप गेल्यावर काठी आपटण्या सारखे आहे ‘.