विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार – नितीन गडकरी
रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर
– अॅडव्हान्टेज विदर्भ महोत्सवाचा शुभारंभ
– नारायण राणे, देवंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर / प्रतिनिधी
विदर्भाच्या औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास साधायचा असेल पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे जेणेकरून मोठ्या उद्योगांसाठी दळणवळण सुविधा उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्याच संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव -अॅडव्हान्टेज विदर्भ च्या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे स्थानिक नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड परिसरात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. अशोक नेते, संरक्षण विभागाचे सल्लागार ले. जनरल विनोद खंडारे, आ. आशिष जयस्वाल, व्ही एनआयटीचे डॉ. प्रमोद पडोळे, आयआयएचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, आ. मोहन मते, एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
रस्ते, वीज , पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ हे या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रक्पल विदर्भांत गुंतवणूक आकर्षित करतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भ हे मागासलेले क्षेत्र म्हणून चर्चा होते, पण विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे द्रष्टे आणि विदर्भाविषयी आपुलकी असलेले नेते आहेत, व निसर्गाचे दान देखील भरपूर मिळाले आहे, त्यामुळे आगामी ५ वर्षात आत्मनिर्भर भारतात विकसित विदर्भ दिसेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र गीत आणि औपचारिक स्वागतानंतर स्वागत भाषण अध्यक्ष आशिष काळे यांनी केले व त्यातून महोत्सवातील आगामी तीन दिवसांच्या कार्यकलापांची माहिती दिली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी,सध्या नाागपूर व विदर्भासाठी सुवर्णकाळ आहे, यातून विदर्भ विकासासाठी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असल्याने हा हेतू साध्य होईल असे सांगितले.
यावेळी माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, या महोत्सवात केवळ विदर्भ विकासावर फोकस करण्यात आला आहे. यात सर्वांचे योगदान मिळाल्यास तो हेतू सफल होईल असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विदर्भ विकासात अॅडव्हान्टेज विदर्भ मैलाचा दगड सिद्ध होईल, यातून रस्ते, पाणी, वीज, संचारसेवा आणि मुलभूत सोयीसुविधा यांचा लाभ मिळून विदर्भाचा सर्वांगिण विकास होईल असे सांगितले.
सामंजस्य करार: या कार्यक्रमात एएआर इंदेमार आणि नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट, प्रियदर्शनी कॉलेज व नागपूर विद्यापीठ यांच्यात अध्ययन अध्यापनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर व डॉ. बिंदू चिमोटे यांनी केले. आभारप्रदर्शन एडचे सचिव डॉ. विजय शर्मा यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ उपस्थित होते.
पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन
अॅडव्हान्टेज विदर्भ हा प्रदर्शन व महोत्सव यावर्षी प्रथमच होत आहे, यातून अभ्यास करुन काही सुधारणा पुढील वर्षी करण्यात येतील आणि त्यात प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन यात असेल व त्यातून त्या जिल्ह्याची माहिती, उपलब्धता आणि विकासाला असलेला वाव यांचे दर्शन होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.