विदेश
१३ वर्षाच्या मुलाने८० हजार लोकांसमोर आरोपीला दिली अशी शिक्षा की..,

काबूल / नवप्रहार ब्युरो
१३ वर्षाच्या मुलाच्या कुटुंबीयांना संपविणाऱ्या आरोपीला मुलाने ८० हजार लोकांसमोर दिलीं अशी शिक्षा की जगभर होतेय त्याची चर्चा. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने देखील यावर संताप व्यक्त केला आहे. घटना
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील आहे.
हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या मंगल नावाच्या तरुणाला जाहीररित्या मृत्यूदंड देण्यात आला. एका स्टेडियममध्ये दोषीवर गोळी झाडण्यात आली. त्यावेळी तिथे ८० हजार जण उपस्थित होते. ही सगळी गर्दी फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा पाहायला जमली होती. धक्कादायक बाब म्हणजे दोषीवर एका १३ वर्षीय मुलानं गोळी झाडली. त्याचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत.
मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीवर १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबातील १३ जणांना संपवल्याचा आरोप आहे. यातील ९ लहान मुलं होती. तालिबानी अधिकाऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं. त्याचं नाव मंगल आहे. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. न्यायालयानं मंगलला दोषी ठरवलं. यानंतर तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी मंगलला मृत्यूदंडाची शिक्षा मंजूर केली.
मंगलला खोस्त प्रांतातील एका स्टेडियममध्ये मृत्यूदंड ठोठावण्यात आला. कुटुंबातील
१३ जणांना गमावणाऱ्या मुलानं मंगलवर गोळी झाडली. यावेळी स्टेडियममध्ये जवळपास ८० हजार जण उपस्थित होते. गोळी झाडण्याचा आवाज येताच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तालिबान शासन काळात एखाद्या गुन्हेगाराला सार्वजनिकरित्या मृत्यूदंड देण्याची ही अकरावी घटना आहे.
सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात किसास म्हणजेच बदल्याची शिक्षा सुनावली होती. आरोपी मंगलला आधी कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवलं. मग त्यानं याच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. पण तेव्हाही निकाल त्याच्या विरोधात गेला. अखेरचा शेवटचा पर्याय म्हणून तो सर्वोच्च न्यायालयात गेला. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल मानवाधिकार संघटनांनी संशय व्यक्त केला आहे. तालिबानी न्याय प्रणाली पारदर्शकता आणि निष्पक्षतेपासून कोसो दूर असल्याचं संघटनांनी म्हटलं आहे.
तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानात देण्यात आलेली शिक्षा अमानवीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचं संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी म्हटलं. सार्वजनिकरित्या दिल्या जाणाऱ्या मृत्यूदंडाच्या शिक्षा थांबवण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. पण तालिबानी अधिकारी आणि तालिबान समर्थकांनी या शिक्षेचं समर्थन केलं. हाच इस्लामी न्याय असून तो योग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.




