आपली अब्रु वाचविण्यासाठी ती जंगलात रात्रीच्या अंधारात लपली

डेहराडून / विशेष प्रतिनिधी
ती सहलीसाठी दिल्लीहून एकटीच निघाली होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. तिने कसेबसे त्याच्या तावडीतून स्वतःला सावरत जंगलात पळ काढला. आणि रात्रभर जंगलात लपून स्वतःची अब्रु वाचवली.
तरुणी दिल्लीहून डेहराडूनमार्गे काठगोदाम येथे पोहोचली होती. तिथून तिने नैनीतालला जाण्यासाठी एक टॅक्सी भाड्याने घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १:३० च्या सुमारास चालकाने टॅक्सी मुख्य रस्त्यावरून पटवा डांगर येथील एका निर्जन रस्त्याकडे वळवली. तरुणीने यावर आक्षेप घेतला असता, चालकाने तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिचे अपहरण करून तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
स्वतःचा बचाव करण्यासाठी ही तरुणी तातडीने टॅक्सीतून उतरून जवळच्या जंगलात पळाली. मोबाईल जवळ नसल्यामुळे कोणाशीही संपर्क साधणे शक्य नव्हते, अशा परिस्थितीत तिने जखमी अवस्थेत संपूर्ण रात्र जंगलात लपून काढली. शुक्रवारी सकाळी तिने कसेबसे पटवा डांगर गाव गाठले आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. सीसीटीव्ही फुटेज, टॅक्सीचा क्रमांक आणि जीपीएस यंत्रणेच्या आधारे पोलिसांनी दीपक सिंह बोरा (३९, रा. हलद्वानी) या आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पीडितेचा मोबाईल जप्त केला असून गुन्ह्यात वापरलेली टॅक्सीही ताब्यात घेतली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैनीतालमध्ये पर्यटक आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा दावा नैनीतालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंजुनाथ टीसी यांनी माध्यमांशी बोलताना केला.
टॅक्सी चालकाला गाडी सोपवण्यापूर्वी त्याची कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. या प्रकरणात आरोपी दुसऱ्याची टॅक्सी चालवत असल्याचे समोर आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या टॅक्सी मालकांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.




