युपी मधील मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणाची ‘ लव्ह स्टोरी ‘ ठरत आहे हायप्रोफाइल स्टोरी

बरेली / नवप्रहार ब्युरो
उत्तरप्रदेश मध्ये मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणाची लव्ह स्टोरी हायप्रोफाईल लव्ह स्टोरी ठरत आहे. संपूर्ण राज्यात याच प्रकरणाची चर्चा आहे. येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम तरुणीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर तरुणीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अपहरणासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित तरुणीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, हे प्रेम प्रकरण उत्तर प्रदेशातील हायप्रोफाइल लव्ह स्टोरी ठरत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बरेलीच्या दानिया नाझ नावाच्या तरुणीने धार्मिक भिंत तोडून हर्षितशी लग्न केलं आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दानियाने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली. जन्मत: मुस्लीम असलेल्या दानियाची वर्गमित्र हर्षित यादव नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. दोघांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दानियाने एक आठवड्यापूर्वी हर्षित यादवशी मंदिरात लग्न केलं. जेव्हा याबाबत दानियाच्या वडिलांना कळलं, तेव्हा त्यांनी हर्षित यादव, त्याचे वडील आणि अर्धा डझन इतर लोकांविरुद्ध बरेलीतील प्रेम नगर पोलिस ठाण्यात अपहरणासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर, जेव्हा पोलिसांनी कारवाईची चक्र फिरवली, तेव्हा दानियाने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बरेलीच्या एसपींकडे मदत मागितली. दानियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याचा केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की पोलिसांनी हर्षित यादव आणि त्याच्या नातेवाईकांना अजिबात त्रास देऊ नये. मी खूप आनंदी आहे. मी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे.
दानियाने तिच्या वडिलांना विनंती केली, ‘पापा, मी प्रौढ आहे. मी माझ्या स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे. मी खूप आनंदी आहे, म्हणून अपहरणाचा खटला मागे घ्या. मला आणि माझ्या सासरच्यांना त्रास देऊ नका.’
दुसऱ्या एका व्हिडिओतर दानियाने आपल्या कुटुंबीयांची पाठराखण केली आहे. ‘माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर बोट ठेवण्यापूर्वी, स्वतःच्या कुटुंबाकडे पहा. माझ्या कुटुंबाचा यात काही दोष नाही. माझ्या कुटुंबाला यात सामील करू नका. मी चूक केली आहे, पण माझ्या कुटुंबाने नाही. त्याने मला खूप चांगले संस्कार दिले आहेत. जर मी त्यांचे काही वाईट केले असेल तर तुम्ही मला दोष द्यावा, कुटुंबातील सदस्यांना नाही.’
तूर्तास पोलिसांनी दानियाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे हर्षित यादवसह अर्धा डझन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच न्यायालयासमोर दानियाचा जबाब नोंदवून कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.