पत्रकाराला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करा
पत्रकार संघटनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
राजू आगलावे/जि.प्र.
नव प्रहार/ भंडारा
कोविड कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने कंबोज बारमध्ये कारवाई केली होती. त्या कारवाईची बातमी का लावली? असे, दोन वर्षांनी विचारून कंबोज बारच्या मालकाने पत्रकार प्रतिक तांबोळी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, या आशयाचे निवेदन व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन दिले.
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिक तांबोळी हे गुरूवार, दि. 13 जुलैच्या रात्री 11 वाजता नागपूर मार्गावर थांबले असताना, संजय कंबोज यांचा पुतण्या त्यांच्याजवळ येऊन बातमी लावणारा तुच होता ना, असे म्हणत कॉलर पकडली. दरम्यान संजय कंबोज तिथे आले व त्यांनी मारहाण केली. यात तांबोळी यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी तांबोळी यांनी रात्रीच भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये जावून तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांची जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात त्यांना गंभीर दुखापत असल्याचे आढळून आले आहे. त्यावरून भंडारा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
*पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले पाहता, ही दुर्दैवी घटना आहे. राज्यात पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले असल्यामुळे अशा प्रकरणात, पत्रकार संरक्षण अधीनियमान्वये आरोपींविरूद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी आणि सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.*
निवेदन देतेवेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परसावार, कार्याध्यक्ष राजू मस्के, उपाध्यक्ष समशेर खान, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले, प्रा.नदीम खान, दीपेंद्र गोस्वामी, काशिनाथ ढोमणे, अजय मेश्राम, प्रतिक तांबोळी, विलास सुदामे, शुभम देशमुख, चंद्रकांत श्रीकोंडवार, विजय क्षीरसागर, मुकेश मेश्राम यांच्यासह पत्रकारबांधव उपस्थित होते.