तुमचेही पोट रोज साफ होत नाही का ? करा हा उपाय, झटक्यात होईल पोट साफ

सगळ्याच आजाराचे गूढ आपल्या पोटात लपले असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील लोक आणि जुने लोकं सांगतात. जर तुमचे पोट सकाळी व्यवस्थित स्वच्छ झाले, तर तुमचा अर्धा दिवस आपोआपच चांगला जातो. पण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आज अनेकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांच्या वतीने यासंदर्भात सोशल मीडियावर पोटाच्या आरोग्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी काही खास ‘मॉर्निंग हॅबिट्स’ सांगितल्या आहेत. या सवयींचा अवलंब केल्यास तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ राहतील आणि तुम्हाला दिवसभर हलके व ताजेतवाने वाटेल.
दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा
रात्री ७ ते ८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते. अशा वेळी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
फायदा : कोमट पाण्यामुळे आतड्यांची हालचाल (Peristalsis) वेगवान होते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या शौचास साफ होते. चवीसाठी आणि अधिक फायद्यासाठी तुम्ही यात लिंबाचे काही थेंबही टाकू शकता.
शरीराची हालचाल आणि व्यायाम
सकाळी उठल्यावर १० ते १५ मिनिटे हलके स्ट्रेचिंग, योगासने किंवा फेरफटका मारणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे पोटाच्या स्नायूंना मसाज मिळतो आणि आतड्यांमध्ये साठलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते.
फायबर आणि प्रथिनांचा ताकदीचा नाश्ता
तुमच्या नाश्त्यामध्ये फायबर आणि प्रथिनांचे योग्य मिश्रण असावे.
फायबर : ओट्स, ताजी फळे, चिया सीड्स किंवा मोड आलेली कडधान्ये आतड्यांतील ‘गुड बॅक्टेरिया’साठी अन्न म्हणून काम करतात.
प्रथिने : अंडी, दही किंवा पनीर यांसारख्या पदार्थांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचनसंस्था मजबूत होते.
‘माइंडफुल इटिंग’: मोबाईलपासून दूर राहा
अनेकांना नाश्ता करताना मोबाईल पाहण्याची सवय असते. डॉक्टरांच्या मते, ही सवय पचनक्रियेसाठी घातक आहे.
फायदा : अन्नाकडे लक्ष देऊन आणि व्यवस्थित चावून खाल्ल्याने लाळ अन्नात नीट मिसळते, ज्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते आणि पोट फुगण्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
आले चहा किंवा लिंबू पाणी
सकाळी साध्या चहाऐवजी आल्याचा चहा किंवा कोमट लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे पोटातील सूज कमी करून अन्न पचवण्यास मदत करतात.
सूर्यप्रकाश अन् साखरेवर नियंत्रण
व्हिटॅमिन डी : सकाळी १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी वाढते, जे थेट पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे.
साखर टाळा : सकाळी जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने आतड्यांमधील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते. त्यामुळे गोड धान्ये खाणे टाळावे.




