जे बाळासाहेबांचे झाले नाही ते राज ठाकरेंचे काय होणार ? कोण बोलले असे
मुंबई / विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मनसे ने महायुती ला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महायुती मनसे च्या काही मोजक्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असा त्यांचा समज होता. परंतु महायुतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि कल्याण येथून आ. राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मनसे चे राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्र विरोधात तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच थेट सामना होत आहे.
दुसरीकडे मनसे आणि वंचित बहुजन आघाडीनेही मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील माहीम मतदारसंघांतील लढतीवरुन मनसे विरुद्ध शिवसेना आमने-सामने आली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंविरुद्ध शिवसेना महायुतीने उमेदवार दिला असून आज शेवटपर्यंत सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे, राज ठाकरेंनी सद सरवणकर यांची भेट नाकारल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्याविरुद्धही शिवसेना महायुतीने उमेदवार मैदानात उतरवल्याने आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथील मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना राजू पाटील यांचा पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मतदारसंघात सभा घेऊन शिंदेंचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच, आता विधानसभा निवडणुकीत परतफेड म्हणून महायुती कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून राजेश गोवर्धन मोरे यांना येथील उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र महायुतीने उमेदवार कायम ठेवला आहे. त्यावरुन बोलताना आमदार राजू पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुभाष गणू भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगितलं की, इथं आपल्याला उमेदवार येणार आहे. मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज साहेबांचे काय होणार, असे म्हणत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार आणि आमदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल केला. मला इथलं लोकलंच राजकारण माहिती आहे, जो मला गेल्या 5 वर्षात या लोकांनी त्रास दिलाय किंवा मी त्यांना क्रॉस केलेलं आहे. तो वचपा काढण्यासाठी, सुडाची भावना ठेऊन उमेदवार देणार हे मला माहिती होतं, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं. दरम्यान, कल्याण ग्रामीण मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होत आहे. येथून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशी लढत पाहायला मिळणार आहे.