सामाजिक

उंचखडक बुद्रुक येथे ” आई – वडिलांप्रती ” एक अनोखा कृतज्ञता सोहळा ….!!!

Spread the love

 

अकोले : गेली २३ वर्षांपासून म्हणजे आमचे आजोबा कै.भाऊसाहेब रंगनाथ देशमुख(बाबा) यांच्या निधनानंतर माझे वडील व चुलते यांनी बाबांच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहुन एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी व येणारी पिढी संस्कारक्षम घडवण्यासाठी आजोबांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला सुरवात केली,होय आमचं सर्व कुटुंब या पुण्यस्मरणाकडे एक सोहळ्याप्रमाणेच बघतं.ज्या गोष्टीला सुरुवात असते

त्या गोष्टीचा अंत ठरलेला असतो हे एक त्रिकालबाधित सत्य आहे.जो व्यक्ती जन्म घेतो त्या व्यक्तीचे हे जग सोडून जाणे अटळ आहे,म्हणजेच ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा आहे हे स्वीकारत माझे वडील अशोकराव देशमुख(आण्णा) व चुलते यांना आई वडिलांचे सानिध्य कमी मिळाल्यामुळे आम्ही आमच्या आज्जी – आजोबांचा या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सर्व नातेवाईक,मित्र परिवार व कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत आठवणींना उजाळा देतो,या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हा कुटुंबातील सर्व सदस्यांना एकप्रकारे जीवन जगण्याची ऊर्जा मिळते.खरं तर हा पुण्यस्मरणाचा सोहळा गेली २३ वर्षाच्या कालखंडात अनेक नातेवाईकांच्या,मित्रपरिवाराच्या अंतःकरणापर्यंत भिडलाय तर पुण्यतिथीच्या अगोदरच या सर्वांचे फोन यायला सुरुवात होते की या वर्षी किती तारखेला पुण्यस्मरण आहे.आमची कुटुंब व्यवस्था उभी करण्यात आजोबांचं योगदान आहेच परंतु आमची आज्जी कै.गं.भा.शांताबाई भा. देशमुख(आक्का) चं मोठं योगदान आहे असं मला वाटतं.मला आजही आठवतं की आमच्या आजोबांच्या निधनामुळे दिवाळी सण करायचा नाही असे घरात ठरलं परंतु आमच्या आज्जीने वडिलांना सांगितलं की “संपूर्ण गाव सण करणार अन माझी पोरं बिगर सणाची ठेवायची का पोरांची दिवाळी केली पाहिजे” म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की आमची आज्जी फार शिकलेली नसली तरी तिची विचारधारा मात्र आधुनिक होती.अतिशय गरिबीतुन कुटुंबच नव्हे तर गावाला दिशा देण्याचं काम आमच्या आज्जीनं केलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज माझे मोठे चुलते कै.प्रल्हाद भा देशमुख हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी प्रगतशील शेती करत गावच्या वैभवात भर टाकण्याचे काम केले,दोन नंबर माझ्या वडिलांनी आण्णांनी देखील वीजवितरण कंपनीतली नोकरी सोडत सामाजिक कार्याची आवड असल्याने अकोले तालुक्यात एक सुसंस्कृत समाजकारणी म्हणून नाव कमावले,तीन नंबर चुलते शिक्षक,चार नंबर स्थापत्य अभियंता तर पाच नंबर चुलते यांनी कल्याण सारख्या शहरात जाऊन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थापत्य उपअभियंत्याची नोकरी करत सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे नाव कमविले आहे.आजही आज्जी आजोबांच्या संस्कारात घडलेल्या आमच्या कुटुंबातील सर्व नातवंडे महीपाल देशमुख(बबनभाऊ) यांनी व्यवसाय करत गावातील सरपंच,बुवासाहेब नवले मल्टिस्टेट पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत सामाजिक कार्यास सुरवात केलेली आहे,

आम्ही बाकी सर्व नातवंडे नोकरी,उद्योग,शेती या क्षेत्रात कार्य करत आहे.माझा मोठा भाऊ ” गोकुळ ” हा अडीच वर्षाचा असतांनी त्याचे आकस्मित निधन झाल्याने आमच्या आज्जीने आम्हा सर्वच नातवंडांवर विशेष लक्ष दिले.माझे वडील आण्णा जरी कुटुंबप्रमुख,गावचे सरपंच,कारखान्याचे संचालक होते परंतु त्यांनी आज्जीचा आदरयुक्त धाक नेहमीच पाळला,आज्जीला विचारल्याशिवाय ते कुठल्याच नवीन कामाला सुरवात करत नसे म्हणून तीच सवय आज आमचे चुलते,चुलत भाऊ व आम्हाला लागली आहे काहीही करायचे असेल तर माझे वडील आण्णा व कुटुंबात सल्लामसलत करूनच करायचे म्हणून तर कोणी तरी म्हटले आहे की “जे पेराल तेच उगवणार “.सांगण्यासारखे प्रसंग भरपूर आहे परंतु मला आज्जीचा जो कणखर बाणा आहे तो विशेद करूशी वाटतो.आमचं गाव तसं तालुक्याला नजीकच गाव त्यातल्यात्यात आमची वस्ती २.५ कीमी,आण्णांच्या तालुक्यातील सामाजिक व राजकीय कारकिर्दीला सुरवात ही शेतकरी संघटनेच्या मध्येमातून प्रस्थापितांच्या विरोधात झाली त्या काळात विरोधकांच्या सर्व बैठका ह्या आमच्या वस्तीवर होत असे त्यामध्ये शेतकरी नेते दशरथ सावंतसाहेब,अशोकराव भांगरेसाहेब,मधुभाऊ नवले,जेडी आंबरे पाटील,शिवाजीराजे धुमाळ,झुंबरदादा आरोटे,पाटीलबुवा सावंत,रंगनाथमामा मालुंजकर,प्रकाशराव मालुंजकर,गुलाबराव शेवाळे,रमेशआण्णा जगताप हे सर्व असत तेंव्हा कुठल्या तरी निवडणुकीत आण्णांना तिकीट देत नाही अशी कुणकुण आज्जीला लागली तर आज्जीने त्यांना सुनावले की ” पोराचा नुसताच झेंडे उचलायला नका उपयोग करू तर कुठं तरी अकोल्यातील राजकारणात स्थिरस्थावर करा ” तेंव्हा आण्णांना कारखान्याच्या निवडणुकीत तिकीट दिले आणि त्या निवडणुकीत आण्णांसह विरोधी पॅनलचे ११ संचालक व सत्ताधारी पॅनेलचे ११ संचालक विजयी झाले म्हणजे वेळप्रसंगी आज्जी जेव्हढी प्रेमळ होती तेव्हडी कणखर देखील होती.आज्जी म्हणजे गावातील लहान थोर मोठ्यांचं गाऱ्हाणं ऐकायच ठिकाण होतं कारण गावातील अनेक महिला आपल्या कौटुंबिक समस्या आज्जीला सांगत तेंव्हा चांगले सल्ले देऊन आज्जीने अनेक कुटुंब उभी केलेली मी पाहीले आहे.आण्णांचा स्वभाव शिस्तप्रिय असल्याकारणाने गावातील अनेक लोक वेडीवाकडी कामे डायरेक्ट आण्णांकडे घेऊ जात नव्हती तर ते आज्जीला सांगून पूर्ण करून घेत असतं.आज्जीच्या मार्गदर्शनाखाली आण्णांनी गावातील महिला सक्षमीकरणासाठी,महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून जिजामाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था सुरु केली व आजही ती संस्था अतिशय पारदर्शी कारभार ठेवत सुरु आहे.आज्जी कुटुंबातील व गावातील सदस्यांच्या व्यतिरिक्त योगी केशवबाबा चौधरी,एस.झेड.देशमुखसर(सोपानकाका),रमेशआण्णा जगताप,सर्जेराव देशमुख(मामा),सुनील वाळुंजसर,कै.संपत वाळुंजसर यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांपैकीच समजत असे तसेच आज्जी नेहमी म्हणायची की सीताराम पाटील गायकरसाहेब आणि मधुभाऊ नवले ही आपली आणि खरी माणसे आहेत.मागील २ – ३ वर्षांपूर्वी आम्ही मातोश्री शांताई देशमुख सोशिअल फाऊंडेशन व मुंबई येथील काही सोशिअल फाउंडेशच्या मध्येमातून ऊस तोडणी कामगारांचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाल्यामुळे ब्लॅंकेट,बकेट,चटई,बॅटरी अशा १० गृहपयोगी वस्तूंचा संच भेट म्हणून दिला असता अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ.किरणजी लहामटे साहेब यांनी स्वतः घरी येऊन या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या व वेळ मिळेल तसा मी देखील या कृतज्ञता सोहळ्यात उपस्थित राहत जाईल अशी इच्छा व्यक्त केली.आमची आज्जी नेहमी सांगायची की “कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी हरकत नाही पण कोणाचं वाईट करायचं नाही आणि चिंतायचं पण नाही” म्हणून आजही आमचं सर्व कुटुंब आज्जी-आजोबांच्या जुन्या स्मुर्तीना उजाळा देत समाजात सामाजिक भान ठेवत, “स्वाभिमानाला” कुठलाही तडा जाऊ न देता आपलं जीवन व्यथित करत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षी देखील बुधवार दि.०३-१२-२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आमच्या उंचखडक बुद्रुक,ता.अकोले येथील ” गोकुळगड ” या वस्तीवर हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे व त्यानिमित्ताने अन्नदानाचे कार्य देखील होणार आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने मी आमच्या आज्जी – आजोबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्याबद्दल दोन शब्द म्हणावे वाटतात की,
“संस्काराचे नाते तुटता तुटत नाही..”
“माणसे संपली तरी संबंध मिटत नाही..”
“शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही..”
“तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही..”

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close