करणी केली म्हणून वृद्धास मारहाण अंनिसच्या प्रयत्नाने जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यातील सगरोळी येथील ७५ वर्षीय वृद्धास करणी करतो म्हणून तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. पिडीत व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ३२४, ३२३, ५०४, ५०६ व २४ ही कलमे लावली होती. परंतु करणी केली म्हणून मारहाण केल्याबाबत जादू टोना विरोधी कायद्या चे कलम लावण्यात आले नव्हते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले.
चांदु सटवाजी गायकवाड हे ७५ वर्षीय गृहस्थ सकाळी आठ वाजता सगरोळी येथील एका हॉटेलवर चहा पीत होते तिथे गावातील शिवाजी गायकवाड, विकास गायकवाड व अंजू आले व आमच्या मुलीला करणी का केली अशी विचारणा करत यांनी थापड, बुक्क्या व काठीने जबर मारहाण केली. मारहाणीतून सुटका करून घेण्यासाठी ते जवळच असलेल्या पोलीस चौकीमध्ये जाऊन बसले. तरीही त्यांनी पोलीस चौकीतून बाहेर काढून मारहाण केली व स्वतःच्या घरी घेऊन गेले. घरी मारहाण केली व परत चौकात आणून पुन्हा मारहाण केली. नाकाला व डोळ्याजवळ जबर मार लागल्यामुळे डोळा सुजला होता व नाकातून रक्त वाहत होते.
या घटनेबाबत बाहेरगावी असलेल्या पिडिताच्या मुलाला कळाल्यानंतर त्यानेच येऊन वडिलाला सगरोळी येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी शासकीय रुग्णालय, नांदेड येथे तात्काळ घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
या घटनेची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य इंजि. सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे आदी कार्यकर्त्यांना कळवल्यानंतर त्यांनी पीडिताची नांदेड येथील दवाखान्यात भेट घेऊन वस्तूस्थिती जाणून घेतली, बिलोली पोलीस स्टेशनला भेट दिली व जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याविषयी पाठपुरावा केला. जारनमारण करनी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिच्या नग्न अवस्थेत दिंड काढणे,किंवा त्याच्या रोजच्या व्यवहारावर बंदी घालने हा गुन्हा आहे,कलम ७ वाढवण्याबाबत बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी अंनिसला व पिडित कुटुंबाला सहकार्य केले.