रेप चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याना 20 वर्षानंतर शिक्षा
सिंधुदुर्ग / नवप्रहार न्यूज नेटवर्क
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत फिर्यादी कडून 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.तर दुसऱ्या एका लाचेच्या प्रकरणात लाचखोर कनिष्ठ अभियंता आणि वायरमनला 20 वर्षानंतर शिक्षा झाली आहे.
ही कारवाई काल (20 एप्रिल) करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सापळा रचत त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्कम घेताना पकडले आहे. या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
याप्रकरणी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराला तुझ्याविरोधात कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांनी दिली होती. तसंच तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
20 हजार रुपयांची लाच घेताना पीएसआय आणि हवालदार अटकेत
त्यानुसार तक्रारदाराने सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. दरम्यान ठरल्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
घरावर एसीबीचा छापा, मालमत्तेसह कागदपत्रांची तपासणी
या प्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.
सोलापूर महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि वायरमनला तब्बल वीस वर्षांनी शिक्षा!
दुसरीकडे सोलापूर महावितरण कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याला आणि वायरमनला लाच घेतल्याप्रकरणी तब्बल वीस वर्षानंतर शिक्षा ठोठवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये अभियंता बाबुराव म्हेत्रेला एका वर्षाची, तर वायरमन इलाही शेख याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच म्हेत्रेला दहा हजार रुपयांचा आणि शेख याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास या दोघांना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.