पांढरी खानमपूर प्रवेशद्वार प्रकरणी जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची गरज
पांढरी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
*
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
गेली आठ दिवसापासून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे लावलेल्या प्रवेशद्वारावरून सुरू असलेल्या प्रकरणी तेथील एकूण परिस्थिती बघता जिल्हा प्रशासनाने त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे चर्चा असतांना अखेर वरिष्ठ प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही त्यामुळे प्रकरणाला दिवासेंदिवस गंभीर वळण लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे अखेरच्या क्षणी पांढरी गावात पॉवर ऑफ मिडियाचे पत्रकारांनी नुकतीच भेट दिली असता दिसून आले आहे.
याबाबत माहिती अशी की, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर गावात प्रवेशद्वारावरून गेल्या 26 जानेवारी च्या ठरावावरून वाद सुरू आहे. जवळपास एक महिना होत आहे या गावातील प्रकरण चिघळत असून संपूर्ण प्रकरणाला जातीय स्वरूप आले असल्याचे दिसून येत आहे. आज अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पावर ऑफ मीडियाच्या पत्रकारांनी सदर गावात भेट देऊन दोन्ही गटातील नागरिकांशी चर्चा केली. परंतु दोन्ही गट आपआपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. एका गटाचे म्हणणे असे आले की ग्रामपंचायत ने नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू करावे तेव्हाच सध्या उभे असलेले प्रवेशद्वार काढावे. तर दुसऱ्या गटातील नागरिक सर्वप्रथम अवैध प्रवेशद्वार काढून टाकावे, व सदरचे काम हे ग्रामपंचायत स्तरावरील असून पुढचा निर्णय ग्रामपंचायत सचिव, सरपंच घेतील ह्या निर्णयावर ठाम आहेत.त्यामुळे पांढरी खानापूर येथील एकूण परिस्थिती चिघळली असल्याचे चित्र सध्या पांढरी गावात असून या गावात जातीय स्वरूपाचे चित्र निर्माण झाले आहे.ह्यामध्ये बाहेरील लोकांकडिल भडकाऊ भाषणाचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे. पांढरी गावातील प्रवेशद्वार प्रकरणावरून जातीय विषमतेचे गंभीर चित्र निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासन या प्रकरणी त्वरित ठोस निर्णय का घेत नाही? असा सवाल त्रयस्थ नागरिक करीत आहेत. पांढरी खानम पूर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वारा प्रकरणी तातडीने निर्णय न घेतल्यास या गावाला गंभीर वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने त्वरित ठोस भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.