नियतीला त्यांचे मिलन मान्य नव्हते की काय ?
नशिबात कोणाच्या काय लिहून ठेवले आहे हे नियतीलच माहीत. जीवनात अशी एखादी घटना घडते की कधी कधी मनात ईश्वरालाच या बद्दल विचारावे असा विचार येतो. या घटनेत देखील असेच झाले आहे. 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नावदाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तर मुलाचे आईवडील गंभीर जखमी झोरे आहेत.
इस्लामपूर / विशेष प्रतिनिधी
इंद्रजित मोहन ढमणगे (वय 29 वर्षे) आणि कल्याणी इंद्रजित ढमणगे (वय 24 वर्षे दोघे रा. किसाननगर, इस्लामपूर, जि. सांगली) अशी मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. कल्याणी यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आहे, तर इंद्रजित हा मुंबईमध्ये टीसीएस कंपनीत कार्यरत होता. रविवारी (2 एप्रिल) पहाटे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. जखमी असलेल्या वडील मोहन आणि आई मिनाक्षी यांच्यावर इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कर्नाटकमधील हलूरजवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कार अपघात झाला. यामध्ये देवदर्शनाला गेलेले कारमधील नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आणि दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (1 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. मृत इंद्रजीत यांचे वडील मोहन (वय 65 वर्षे) आणि आई मिनाक्षी (वय 59 वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवदाम्पत्य इंद्रजित आणि कल्याणी कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. सोबत इंद्रजितचे आई-वडीलही होते. इंद्रजित आणि कल्याणी यांचा विवाह 18 मार्च रोजी झाला होता. विवाहानंतर ते कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर परत येत असताना (गुर्लापूर ता. मुडलंगी) जवळ हलूर येथे आले असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारची भीषण धडक झाली. या धडकेमध्ये इंद्रजित आणि कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मरण पावले. कारमध्ये सोबत असलेल्या इंद्रजितचे वडील मोहन आणि आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले. मोहन यांचा हाताला दुखापत झाली असून डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांची पत्नी मिनाक्षी यांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली आहे.
मोहन ढमणगे यांना मयत इंद्रजित हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या भावाचे पार्थिव पाहून बहिणीने हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. वयाची तिशीही पार न केलेल्या मुलाचा अपघातात अंत झाल्याने ढमणगे कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.