सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यात ३५ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

Spread the love

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे

यवतमाळ – हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातही ३५ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले.
या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, युगानुयुगे मारुतीरायाचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती त्यांची ‘गदा’ ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करून प्रभु श्री रामचंद्रांच्या ‘रामराज्या’साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी ११ मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करून घेतली. आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे.
गदापूजनाचे कार्यक्रम अयोध्यापती हनुमान मंदिर, जागृत हनुमान मंदिर, श्री हनुमान मंदिर, प्रगट हनुमान मंदिर, शनि मंदिर, हिंदुराज हनुमान मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, वनवासी हनुमान मंदिर, ढुमनापूर मंदिर यासह जिल्यात ३५ ठिकाणी गदापूजन झाले. या कार्यक्रमात पुणे येथे संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close