कुमार आशीर्वाद यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांना ‘ आशीर्वाद ‘ नाहीच
सोलापूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
कामावर आल्यावर मस्टर रजिस्टर किंवा बायोमॅट्रिक प्रणालीत हजेरी लावून टपरीवर जाऊन चायपाणी घेत गप्पागोष्टी करणे ही कर्मचाऱ्यांची जुनी सवय .पण नवीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत. त्या परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जवळपास २५ कर्मचारी दिसलेच नाहीत. त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचारी सलग तीन दिवस उशिराने कार्यालयात दाखल झाल्यास एक दिवसाची बिनपगारी रजा मांडण्याची कारवाई केली जाते. त्यामुळे त्या लेटमार्क कर्मचाऱ्यांना सुरवातीला कारणे दाखवा नोटिशीचा दणका जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
आता यापुढे तेच किंवा अन्य कोणता कर्मचारी कार्यालयीन वेळेत विनाकारण बाहेर फिरत असल्यास किंवा उशिराने कार्यालयात आल्यास त्यांच्यावर बिनपगारीची कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कार्यालयीन वेळेत कोणीही विनाकारण कार्यालय सोडून बाहेर जाणार नाही, यासंबंधी विभागप्रमुखांनी लक्ष ठेवून त्यासंबंधीची नोंद ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सर्वसामान्यांची कोणतीही कामे विनाकारण अडवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यालयांची माहिती घेतल्यानंतर ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. पण, या त्यांच्या भेटीची अनेकांनी धास्ती घेतली असून आता उद्यापासून (गुरुवार) सर्वजण कार्यालयात वेळेत येतील आणि कार्यालयीन वेळेत बाहेर जाणार नाहीत, असा विश्वास त्यांना आहे.
आठवड्यातील एक दिवस गरजूंसाठी
सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही लाभार्थींना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, कोणीतरी जाणीवपूर्वक अडवणूक करतोय, तालुक्याला त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही, अशा गरजूंच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी आठवड्यातील एक दिवस देण्याच्या दृष्टीने नुतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नियोजन सुरु आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्रलंबित विषयांचा निपटारा आणि जिल्ह्याबद्दल जाणून घ्यायला सुरवात केली आहे.