या कारणाने बापाने मुलाला फासावर लटकवण्याची केली मागणी
उज्जैन (मध्यप्रदेश)/ नवप्रहार मीडिया
गेल्या आठवड्यात महाकाल नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन शहरात रक्ताने माखलेली एक 12 वर्षीय मुलगी मदतीची याचना करत रस्त्यावर फिरत होती. ती अनेकांचे दार ठोठावत होती.पण तिला कोणी मदत केली नाही.एका पुजाऱ्याने हे दृश्य पाहिल्यावर त्याने तिला टॉवेल मध्ये गुंडाळून हॉस्पिटलला पोहचवले होते. त्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून आरोपीच्या शोधात तयार करण्यात आलेली एसआयटी आरोपीचा शोध घेत होती. पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आहे. या आरोपीच्या वडिलांनी त्याला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी ऑटो रिक्षाचालक भरत सोनी याला गुरुवारी अटक करण्यात आली. भरत सोनीच्या वडिलांनी उज्जैनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “हे लज्जास्पद कृत्य आहे. मी त्यांना (भारत सोनी) भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो नाही, पोलिस स्टेशन किंवा कोर्टातही जाणार नाही. माझ्या मुलाने गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला फाशी झाली पाहिजे.”
वकिलाने आरोपीची केस घेऊ नये -बार कौन्सिल
उज्जैन बार कौन्सिलचे अध्यक्ष अशोक यादव म्हणाले की, या घटनेमुळे मंदिरांच्या शहराच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे. ते म्हणाले, “आम्ही बार कौन्सिलच्या सदस्यांना आवाहन करत आहोत की, आरोपींची केस घेऊ नका.”
12 वर्षीय बलात्कार पीडित मुलगी जखमी अवस्थेत उज्जैनच्या रस्त्यावर भटकताना आढळल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी भरत सोनी याला अटक करण्यात आली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.
पीडित मुलगी सतना जिल्ह्यातील रहिवासी ? –
पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, भरत सोनी याला तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो जखमी झाला. पीडित मुलीला इंदूरच्या शासकीय महाराजा तुकोजीराव होळकर महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. समुपदेशकाने मुलीशी बोलले असता ती आंध्र प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले, मात्र तिला तिचे नाव आणि पत्ता बरोबर सांगता आला नाही.
सतना येथे समान वयाच्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले होते, मात्र तीच मुलगी होती का, ज्यावर बलात्कार झाला होता, याची पुष्टी करायची होती.
घटनेवरून काँग्रेसचा भाजपा वर हल्लाबोल –
या घटनेवरून काँग्रेसने मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर निशाणा साधला. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी केला.
अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या सर्वात जास्त घटना एमपीत –
सुप्रिया श्रीनेट यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मध्य प्रदेशात दलित, आदिवासी आणि महिला असणं पाप बनलं आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या (शिवराज सिंह चौहान) 18 वर्षांच्या कारकिर्दीत 28 हजार बलात्कार आणि 68 हजार अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. पण देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे सर्व नेते गप्प बसले आहेत.
या घटनेबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) यांच्या ‘मौन’वरही श्रीनेट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.