आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क मुलीलाच ठेवले गहाण
जयपूर ( राजस्थान ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क
जगात काही घटना अश्या घटतात की त्यावर सहसा विश्वास बसत नाही.अशीच एक अविश्वसनीय घटना राजस्थान च्या जयपूर मध्ये घडली आहे. येथे व्यसनाधीन असलेल्या एका बापाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चक्क आपल्या पोटच्या मुलीला गहाण ठेवले आहे. काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी पोलिसांना या बद्दल कळविले आहे. त्यानंतर त्यांना बाळ कल्याण सुधार समिती कडे सोपवण्यात आले आहे.
कुटुंबियांना बापाचा सगळ्यात मोठा आधार असतो. कुटुंबावर कितीही मोठसंकट आले तरी बाप आहे म्हणून सगळे संकट निस्तारले जाईल हा विश्वास असतो. पण या विश्वासाला तडा देण्याचा प्रकार येथील एका बापाने केला आहे.
जयपूरमधील हा व्यक्ती आपली पत्नी तसंच 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलासोबत राहतो. तो भंगार गोळा करण्याचं काम करतो. तसंच तो मद्याच्या आहारी गेला आहे. दारु पिण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेतले होते. पण हे पैसे तो परत देण्यात असमर्थ ठरत होता.
ज्याने पैसे दिले होते तो वारंवार पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. यादरम्यान, पित्याने कोणी विचारही केला नसेल असं कृत्य केलं. आपल्या मुलीला तो सोबत घेऊन गेला आणि कर्ज देणाऱ्याकडे सोपवलं. हिला भीक मागायला लावा आणि तुमचे पैसे वसूल करुन घ्या. त्यानंतर तिला पुन्हा माझ्याकडे सोपवा असं त्याने सांगितलं.
यानंतर तो मुलीला घेऊन गेला आणि भीक मागण्यास भाग पाडलं. यानंतर मुलगी रोज भीक मागून 100 रुपये घरी आणत होती. तिने आतापर्यंत वडिलांना 4500 रुपये दिले आहेत. यादरम्यान तिचा 6 वर्षांचा भाऊ तिला घेऊन कोटाला गेला.
कोटा येथील रेल्वे कॉलनीत दोघांना फिरताना पाहून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांची चौकशी केली. यानंतर त्यांना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आलं. समितीचे सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचं काऊन्सलिंग केलं असता धक्कादायक माहिती समोर आली.
यावेळी मुलाने सांगितलं की, त्याची आई दिव्यांग असून वडिलांना दारुचं व्यसन आहे. वडिलांनी कर्ज फेडण्यासाठी आपल्या बहिणीला गहाण ठेवलं होतं. अरुण भार्गव यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. पोलीस यारप्रकरणी मुलीला भीक मागायला लावणाऱ्या आरोपी वडिलांवर कारवाई करणार आहे.