अधिवेशनात कोंबड बाजार भरविण्यापेक्षा शेतक-यांचे प्रश्न सोडवा
शेतकरी नेते सिकंदर शहा यांचे कळकळीचे आवाहन
प्रतिनिधी यवतमाळ
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार, मंत्री सर्वसामान्य नागरीक, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याचे सोडून कोंबड बाजारासारखे भांडण करतात. सध्या विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात यावा. इनमिन बारा, पंधरा दिवस चालणारे अधिवेशन अनं त्यात नुसताच कोंबड बाजार भरवाल तर गाठ आमच्याशी आहे, हे विसरु नका असा इशारा शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी दिला आहे.
सरकारने कापूस खरेदी केन्द्र सुरु केले असले तरी मोठया प्रमाणात निकष लावले आहे. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात बाहेर कापूस विक्री करीत आहे. सोयाबिनला आजही आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. विदर्भात सिंचनाची सुविधा अत्यल्प असल्याने शेतकरी फक्त सहा महिने शेती करतो. सिंचनाची सुविधा वाढविल्यास विदर्भाचा शेतकरी वर्षभर पिक घेऊ शकतो. त्या अनुषंगाने अधिवेशनात चर्चा करण्यात यावी. शेतक-यांचे विज बिल अजुनही माफ करण्यात आलेले नाही. शेतक-यांना चौवीस तास विज मिळावी याकरीता निर्णय घेण्याचे आवाहन सुध्दा सिकंदर शहा यांनी केले आहे. देवेंन्द्र फडणवीस हे पुर्वीपासून सोयाबिनला सहा हजार भाव मिळावा याकरीता ओरड करीत आले आहे. मात्र तीन वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर ते यावर काहीच बोलत नाही. शेतमालाला चांगला भाव मिळावा याकरीता केन्द्र सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. शेतमाल निघताच दुस-या देशातून माल आयात केला जातो. यामुळे शेतीमालाचे भाव पडतात. त्यामुळे शेतीबाबत धोरण ठरणे गरजेचे असून याबाबत अधिवेशनात विशेष चर्चा करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली आहे. आपल्या शेतात नेमके कुठले पिक घेतले पाहीजे याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले जात नाही. सरकारने शेतक-यांना मार्गदर्शन करणारी निती अंमलात आनावी. बाजारात कोणत्या पिकाला चांगला भाव तसेच मागणी आहे याबाबत अभ्यास करुन शेतक-यांना मार्गदर्शन करायला पाहीजे. विदर्भात 65 टक्के नागरीक शेतीवर अवलंबून असतांना सरकार शेती उद्योगाकडे गंभीरतेने बघत नाही. शेतक-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना त्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा न करता कोंबड बाजारासारखे वाद केले जात असल्याचा इतिहास आहे. विदर्भातील शेतक-यांची अत्यंत वाईट अवस्था असल्यामुळे अधिवेशनात कोंबड बाजार न भरविता सर्वसामान्य नागरीक तसेच शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात यावे. विरोधी पक्षाचे कमी आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये. शेतकरी तसेच शेतमजुरांबाबत त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आवाहन सिकंदर शहा यांनी केले आहे.
शेतकरी लाडके केव्हा होणार
भाजपा महायुतीने लाडक्या बहीनींना दिड हजाराची मदत देऊन सत्ता हस्तगत केली. आता शेतकरी भाऊ लाडका कधी होणार? असा प्रश्न सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे. शेतीमालाला भाव, विजेची समस्या, बाजारपेठ, सोईस्कर पतपुरवठा यासह सर्व समस्यांचे निराकरण करुन “लाडका शेतकरी” धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.
प्रति, जिल्हा प्रतिनिधी
महोदय, वरील बातमी आपल्या प्रसिध्द वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.
आपलाच
सिकंदर शहा, यवतमाळ