बॅटिंग ची वाट पाहत असलेला क्रिकेटपटू मैदानात उतरण्यापूर्वीच जीवनातून बाद
मध्यप्रदेश / नवप्रहार मीडिया
मागील काही दिवसात तरुणांमध्ये हृदय विकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण तर सोडा काही किशोरवयीन मुले देखील हृदय विकाराच्या झटक्याचा बळी पडले आहेत. क्रिकेट खेळतांना खेळाडूचा मृत्यू होणे हे सातत्याने घडत आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा क्रिकेट च्या मैदानावर खेळाडूच्या मृत्यूची घटना घडली होती. आता देखील खुर्चीवर बसून आपल्या फलंदाजीची वाट पाहणाऱ्या खेळाडू चा खुर्चीवर बसल्या बसल्याच मृत्यू झाला आहे. दीपक खांडेकर असे मृत्यू झालेल्या क्रिकेटरचे नाव असून त्याचे वय 30 वर्ष आहे.
क्रिकेटच्या सामना सुरु असताना मैदानाच्या बाहेर फलंदाजीसाठी जाण्याची वाट पाहत असलेल्या दीपक खांडेकर बसला होता. दरम्यान याचवेळी त्याला छातीत वेदना होऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात नेले. मात्र, त्यापू्र्वीच त्याचे निधन झाले होते. दीपकचे वय केवळ 30 होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याला ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र, कार्डियाक अरेस्टमुळे सर्वकाही अचानक संपले.
तंदुरुस्त असलेल्या दीपकला ह्रदयविकाराचा झटका
दोन महिन्यांपूर्वीच दीपक खांडेकर याचा विवाह झाला होता. शारिरिकदृष्ट्या दीपक अतिशय तंदुरुस्त होता. शिवाय तो उत्तमप्रकारे क्रिकेटही खेळत होता. एक खासगी कंपनीत काम करत तो क्रिकेटचा आनंदही घेत होता. वडिल शेती करतात. क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी दीपक फतेहगढ आला होता.
डॉक्टर काय म्हणाले?
डॉ. विवेक शर्मा दीपक खांडेकरच्या मृत्यूबाबत बोलताना म्हणाले, सध्या युवकांमध्येही ह्रदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ 50 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच ह्रदयविकाराचा झटका येत होता. सध्या युवकांनाही ह्रदयविकाराचा झटका येत आहे. याचे सर्वांत मोठे कारण आहे की, रोजचा आहार आणि आपली रोजची दिनचर्या यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आपल्याला रोजच्या दिवसाचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम आणि योगाही करायला हवा. शिवाय आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे.
युवकांमध्ये हर्ट अटॅक चे प्रमाण वाढले
सध्याच्या घडीला युवकांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हर्ट अॅटॅक येऊन युवकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. क्रिकेटर दीपक खांडेकरप्रमाणेच अनेक युवकांचा मृत्यू झालाय. तरुण वयात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबिय आणि मित्रांना मोठा धक्का बसलाय. इंदुर येथील बाणगंगा भागात राहणाऱ्या हेमलता यांचाही अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. ती केवळ 15 वर्षांची होती, असे कुटुंबियांनी म्हटले होते. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. अशाच प्रकारच्या घटना मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून समोर आल्या आहेत.