सुरवाती पासून गुंतागुंतीच्या असलेल्या बदलापूर प्रकरणात गुंतागुंत वाढली
आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाउंटर
15 दिवसांचे सिसिटीव्ही फुटेज गायब, संस्थाचालक फरार
मुंबई / नवप्रहार डेस्क
बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेले अत्याचाराचे प्रकरण आधी पासूनच गुंतागुंतीचे होते. आता मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित एनकाउंटर झाल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.
पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. पण सुरूवातीपासूनच काहीसे संशयास्पद असलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
ऑगस्ट महिन्यात बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर त्या शाळेतील सफाई कामगार असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याची माहिती असतानाच आता मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदेकडे या प्रकरणासंबंधी सर्वकाही माहिती होती. पण त्याच्या एन्काऊंटरनंतर अजून कोण-कोण या प्रकरणात गुंतलं होतं याची माहिती आता कधीच समोर येणार नाही अशी चर्चा आहे.
तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ
बदलापूरमधील ज्या मुलींवर अत्याचार करण्यात आला त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पण संबंधित शाळेचं नाव ऐकून पोलिसांनी ही तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचं समोर आलं. तक्रारदार पालकांना तब्बल 10 तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दबावानंतर ही तक्रार घेण्यात आली. नंतर या प्रकरणाची तक्रार न घेणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली.
शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब
बदलापूर प्रकरणाचा तपास करताना या शाळेतील सीसीटीव्ही तपासण्यात आले. पण ही घटना ज्यावेळी घडली त्या दरम्यानचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब असल्याचं समोर आलं. स्वतः शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनीच माध्यमांना ही माहिती दिली होती. पोलिसांनीही या प्रकरणी तपास करताना गायब झालेल्या सीसीटीव्हीचा मुद्दा जास्त ताणला नाही. त्यांच्यावर कोणता दबाव होता की जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं हे अद्याप समोर आलं नाही.
संस्थाचालक फरार, कोणतीही कारवाई नाही
बदलापूरमधील ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे या शाळेचं नावही गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या प्रशासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष. ही शाळा नेमकी कुणाची आणि कोण चालवतंय याचीही माहिती समोर येऊ दिली नाही. त्यामुळे शाळेबद्दल असलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न केला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.
ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या संस्थाचालकाला पोलिस वाचवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. आता संस्थाचालक फरार असून पोलिसांना अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागला नाही.
शाळेने पैसे देऊन अक्षयला मारले, पालकांचा आरोप
आपल्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही, तो बंदूक हिसकावून गोळीबार काय करणार असा सवाल मृत अक्षय शिंदेच्या पालकांनी केला. बदलापूर अत्याचार प्रकरणाला शाळा प्रशासन जबाबदार आहे, शाळेनेच पैसे देऊन अक्षयला ठार मारल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या पालकांनी केला आहे.
एकंदरीत, मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून या अत्याचार प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी केला.
या प्रकरणात आणखी किती चिमुकल्या मुलींचे शोषण झाले आहे याचा आता शोध घेतला जाणार का? शाळेवर आणि संस्थाचालकांवर कारवाई होणार का? या प्रकरणात अजून कोण-कोण गुंतलं आहे याचं उत्तर मिळणार का? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील ‘गुपित’ही त्याच्यासोबत जाणार का? या प्रश्नांची उत्तरं आता येणारा काळच देणार आहे.
काय म्हणाले अक्षयचे काका
एन्काऊंटरआधी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची कुटुंबियांशी भेट घेतली होती. या प्रकरणावर त्याच्या काकांनी सामशी बोलतांना सांगितलं की, आम्ही साडेचार वाजता अक्षयची भेट घेतली होती. अक्षय पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करणार नाही, असं अक्षय शिंदे याच्या काका म्हणालेत. आज आम्ही सकाळी साडेदहा वाजता तळोजा तुरुंगात गेलो होतो, त्यावेळी आम्हाला त्याची भेट घेण्यासाठी एक टोकन देण्यात आले.
परंतु पहिल्यावेळेस आम्हाला त्याची भेट झाली नाही. त्यानंतर साडेचार वाजता आमची आणि अक्षयची भेट झाली.तेथून पाच वाजता आम्ही तेथून निघालो. पण अक्षयला बदलापूर येथे घेऊन येणार असल्याचं माहिती दिली नाही. परंतु बंदूक हिसकावून गोळीबार करेल असे वाटत नाही.
दरम्यान आधीपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेलं हे प्रकरण चकमकीमुळे परत एकदा वादात सापडलंय. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरवरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंचऱ्यात उभे केले आहे.
काय म्हणाले अक्षय चे पालक –
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली.
त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सगळ्यानंतर अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. शाळा प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठीच आमच्या मुलाला पैसे देऊन ठार मारले, असा आरोप अक्षय शिंदे याच्या नातेवाईकांनी केला.