जाको राखे साईया….. चा आला प्रत्यय
वायनाड ( केरळ ) / नवप्रहार ब्यूरो
केरळ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. नद्यांना आलेला महापूर आणि भूस्खलन यामुळे ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. पण बचाव पथकाला चार लोकांना मातीच्या धिगाऱ्यातून काढण्यात यश आले आहे.
जिथे भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये केरळच्या वन अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या ऑपरेशननंतर दुर्गम आदिवासी वस्तीतून ६ जणांची सुटका केली आहे.के रळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, “आम्ही एकजुटीने पुन्हा उभं राहू” असं म्हटलं आहे. कलपेट्टा परिक्षेत्राचे वन अधिकारी के. हशीस यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने गुरुवारी एका आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी जंगलातील धोकादायक रस्ता ओलांडून ही बचाव मोहीम यशस्वी केली. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये आदिवासी समाजातील एक ते चार वर्षे वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे.
वायनाडच्या पनिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकलं होतं. बाजुला खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना, हशीस म्हणाले की, त्यांनी गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिलं आणि चौकशी केल्यावर कळलं की त्यांची इतर तीन मुलं आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.
हशीस म्हणाले की, हे कुटुंब आदिवासी समाजाच्या एका विशेष वर्गातील आहेत, जे सहसा बाहेरील लोकांशी संवाद करणं टाळतात. ते सामान्यतः जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असतात. मात्र भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे त्यांना आता अन्न मिळू शकलेलं नाही. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिलं. खूप समजावून सांगितल्यावर, मुलांचे आई-वडील आमच्यासोबत यायला तयार झाले.