ठाकरे बंधूंचे अपयश आणि मोदींचा राजीनामा

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी
20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू काहीतरी चमत्कार करतील नाही निदान राज्यात तर मुंबई बीएमसी तरी आपल्याकडे ठेवतील असा आशावाद मराठी माणसांना होता. पण राज्यात झालेल्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीत 25 वर भाजप ने वर्चस्व गाजवले आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूरमध्ये महाविकासआघाडीला 35 जागा मिळाल्या आहे. मात्र ठाकरे गटाला यश मिळवता आले नसल्याने जेष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याची संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. या बाबींबाबत वारंवार वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही, अशी खंतही सुनील मोदी यांनी व्यक्त केली आहे.
तरीही या संपूर्ण काळात पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे अधिक योग्य वाटल्याने आपण शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे सुनील मोदी यांनी स्पष्ट केले आहे.




