बेवारस प्रेताचे अंत्यसंस्कार करणारी तरुणी अडकली भलत्याच प्रकरणात

पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी
बीबीसी ने कर्तृत्ववान महिलेच्या यादीत केला आहे समावेश
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
वेळ कधी कोणाची कशी पालटेल हे सांगता येत नाही. वेळेत अशी शक्ती आहे की ती राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा करू शकते. याप्रकरणात देखील असेच पाहायला मिळत आहे. काल पर्यंतं लोकांच्या नजरेत एक समाजसेविका, बेवारस प्रेताचे अंत्यसंस्कार करून त्यांच्या मोक्ष प्राप्ती साठी प्रयत्न करणारी. इतकेच नाही तर बीबीसी कडून 100 कर्तृत्ववान महिलांत समावेश झालेल्या तरुणीवर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.
बेवारस मृतांना खांदा देणारी तरुणी जी एकेकाळी अनोळखी व्यक्तीच्या अखेरच्या प्रवासात सामील होत असे.आता याच तरुणीला अशा आरोपाखाली अटक झाली आहे की लोक तिला आता वेगळ्याच नजरेने पहात आहेत. विशेष म्हणजे बीबीसीने या तरुणीचा साल 2024 च्या 100 कतृत्ववान महिलात समावेश केला होता. अशा पूजा शर्मा नामक रुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
कोण आहे पूजा शर्मा
पूजा शर्मा दिल्लीतील समाजसेविका आहेत. २०२२ मध्ये तिच्या आईचा मृत्यू आणि मोठ्या भावाची हत्या झाल्यानंतर तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. तिच्या भावाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी तिने स्वत:च सांभाळली. या अनुभवामुळे तिने विचार केला की ज्यांच्याकडे अंतिम संस्कारासाठी कोणी पुढे येत नाही अशा बेवारस लोकांसाठी मदतीसाठी मदत का करु नये ? त्यानंतर अशा बेवारस लोकांचा अंत्यसंस्काराचा विडाच तिने उचलला. पूजाने आता पर्यंत 6,000 हून अधिक अंत्यसंस्कारचा खर्च उचलला आहे.मृतांच्या धर्म आणि रितीरिवाजानुसार ती अंतिम संस्कार करते.
पूजा अनेकांचा सहारा बनली
पूजाने या कामासाठी स्वत:ची नोकरी सोडली आणि पूर्णवेळी हे काम ती करु लागली. तिने Bright the Soul Foundation नावाची एनजीओ स्थापन केली. आणि गरजू तसेच गरीब लोकांना मदत करु लागली. पूजा हॉस्पिटल आणि पोलीस मॉर्चुरी येथून बेवारस मृतदेहांची माहिती मिळवते आणि त्यांच्यासाठी वाहन आणि अंतिम संस्काराची व्यवस्था करते. हे काम केवळ मृतदेहांचा सन्मान करत नाही तर समाजातील माणूसकी आणि सेवेचे उदाहरण ठरत आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनत आणि सेवेमुळे अनेक लोक आणि संस्था तिच्या मदतीला आल्या, त्यामुळे तिचे मिशन मोठे झाले होते.
परंतू ८ नोव्हेंबरच्या रात्री नंद नगरीत सन्नी मेहरा याच्या झालेल्या हत्येने तिच्या जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. ज्याची तिने कल्पनाही केलेली नसेल.
पूजावर काय आरोप ?
पूजा आणि तिचा भाऊ रवि शर्मा यांना संशय होता की सन्नी याचा त्यांचा भाऊ छटंकी याच्या हत्येत सहभाग होता. या संशयाने त्यांना हिंसक वळणावर उभे केले. आता रवि शर्मा याच्यावर आरोप आहे की त्याने सन्नी याला पार्कमध्ये नेऊन केबलने बांधले. बांबूंनी मारहाण केली आणि त्यावेळी पूजाने तेथे येऊन तिच्या भावाला आणखी भडकल्याचा आरोप आहे.काही वेळा नंतर रवि शर्मा याने पिस्तुल आणले आणि सन्नी याची गोळ्या घालून हत्या केली.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पूजा आणि अन्य एक आरोपी स्पष्ट दिसत आहेत. आता दोघांची रवानगी जेलमध्ये झाली आहे तर मुख्य आरोपी पूजाचा भाऊ रवि शर्मा फरार आहे.



