चर्मकार समाजासाठी नवीन योजना लागू करणार – धम्मज्योती गजभिये
व्यवस्थापकीय संचालकांशी चर्मकार समाजाच्या विविध मागण्याबाबत बैठक
नागपूर, : श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटीचे आहे. त्या निधीचा लाभ गरजू लोकांना होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सोबतच नवीन योजना सुरु करणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सांगितले.
श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार समाजाच्या विविध संघटनांसोबत नुकतीच बैठक झाली. बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री.संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपप्रज्वलन करून झाली. प्रमुख पाहुणे चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे जाती जमाती महामोर्चाचे प्रमुख योगेश पाचपोर, शामराव सरोदें, टिकले, देवेंद्र मांडस्कर, धनराज मनगटे, खुशाल कनोजे, रमेश सरखे, गजानन गडलिंग, पंजाबराव सोनेकर, चेतना रामदास, राजु सेवतकर, गोपाल सोनबरसे, कैलाश चंदनकर, उपस्थित होते.
भैय्यासाहेब बिघाणे यांनी गटई स्टॉलचे वाटप हे पूर्णपणे फॉर्म घेण्यापासून ते गटई स्टॉल वाटपपर्यंत महामंडळाने करायला पाहिजे, अशी मागणी महामंडळाकडे केली. 50 हजार कोटी रुपयांचे लेदर क्लस्टर नागपूर येथे सुरू करण्याकरीता समिती स्थापन करावी व सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा, त्यांनी सांगितले.
लिडकॉमचे विभागीय अधिकारी, सुरेश ढंगे यांनी महामंडळाच्या योजनाविषयी सविस्तर माहिती दिली. नागपूर जिल्हयातील एन.एस.एफ.डी.सी अंतर्गत 17 कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. त्रृटी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना पत्र पाठवून कळविले आहे. त्रुटीपूर्ततेनंतर लाभाच्यांना कर्ज वाटप करण्यात येइल. तसेच नागपूर विभागात एकूण 109 कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या सर्वांच्या कागदाच्याची पूर्तता झाल्यानंतर कर्ज वाटप करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी योगेश पाचपोर यांनी थेट कर्ज योजना सुरू करून 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळाले पाहिजे अशी मागणी केली. नागपूरमध्ये 4 ते 5 लाख चर्मकार समाज आहे. त्या समाजबांधवांना काम मिळवून देण्यासाठी क्लस्टर सुरू व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता रामपुरकर यांनी केले. यावेळी चर्मकार समाजातील समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.