आर्वीचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ‘दत्तोपंतजी ठेंगडींचे’ नाव

सुमित वानखेडेंनी देवेंद्र फडणवीस व मंगल प्रभात लोढांची भेट घेऊन मानले आभार
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामकरणाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली. आता आर्वी येथील शासकिय आयटीआय हे ‘दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी’ या नावाने ओळखल्या जाणार आहे. आर्वीचे नाव देशाच्या इतिहासात कोरणारे दत्तोपंतजी ठेंगडीचे जन्मगाव वर्धा जिल्ह्यातील आर्वी असल्याने आर्वी करांसाठी त्यांचे नाव श्रद्धा स्थानी आहे. त्यामुळे सुमित वानखेडे यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले असल्याने त्यांची भेट घेऊन या निर्णयाबद्दल सर्व आर्वीकरांच्या वतीने आभार मानले.
सुमित वानखेडे यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या विषयी नवी पिढी अवगत व्हावी म्हणून त्यांनी सांगितले की, दत्तोपंतजी चा जन्म १० नोव्हेंबर १९२० ला आर्वी येथे झाला असुन ते भारतीय हिंदू विचारवंत , कामगार संघटना नेते आणि स्वदेशी जागरण मंच , भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघाचे संस्थापक होते. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास १०४ पुस्तके लिहिली. त्यांचे ‘थर्ड वे’ आणि ‘कार्यकर्ता’ ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. त्यामुळे आर्वी भुमीचे नाव उच्च शिखरावर कोरणारे दत्तोपंतजी ठेंगडी आर्वीचे असल्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नावच दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी असे केल्याने सर्व सामान्य आर्वीकरां प्रमाणे माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे.