जिल्हाबाहेरील निवडीने भाजपात कल्लोळ
पदाधिकाऱ्यांचे राजीनाम्यांचे सत्र सुरू
अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ; डॉ. तुमसरे यांचाही राजीनामा
साकोली / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीत जिल्हा अध्यक्ष पद हे जिल्हा बाहेरील व्यक्तींना देण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील बरेचसे आजी माजी आमदार खासदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी याबाबद नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. तर पवनी भाजपा पदाधिकारी मोहन सुरकर, लाखांदूर भाजपाचे नूतन कांबळे, भंडारा भाजपा ममता बगमारे यांसह अनेक पदाधिकारींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यातच २०१४ विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार व भाजपा शेतकरी नेते डॉ. अजयराव तुमसरे यांनीही आपल्या जिल्हा सदस्यपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असल्याची माहिती प्राप्त झाली. काही भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भाजपा जिल्हा अध्यक्षपद भंडारा जिल्हाबाहेरील व्यक्तींना देण्यात का आले.? जिल्ह्यातील नेतृत्व व जाणकारासाठी भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील अन्य भाजपा निष्ठावंत पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नव्हते काय.? यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मनात या विषयावरून तीव्र नाराजी दिसून येत आहे असे माजी भाजपा भंडारा जिल्हा सचिव डॉ. अजयराव तुमसरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे. एकीकडे समोरच्या नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपात असे राजकीय भूकंपाने भारतीय जनता पक्षामध्ये भंडारा जिल्ह्यात राजीनाम्याचे महाभारत सध्या रंगले आहे.