राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांची ‘अभिप्राय कक्षा’स भेट व पाहणी
जिल्ह्याच्या अभिनव प्रयोगाचे आयुक्तांकडून कौतूक
कक्षाद्वारे लाभार्थ्यांकडून घेतला जातो ‘फिडबॅक’
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी युवा ऑपरेटरची टिम
यवतमाळ (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीतपणे आणि निर्धारीत कालावधीत उपलब्ध होतात किंवा नाही याचा लाभार्थ्यांकडूनच दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून ‘अभिप्राय कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. या कक्षास आज अमरावती विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ.एन.रामबाबू यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्याच्या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महा आयटीचे जिल्हा समन्वय अधिकारी फिरोज पठाण उपस्थित होते. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विविध सेवा जसे, जातीचा दाखला, नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी दाखले, प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु या सेवा कालमर्यादेत, विहित शुल्कात आणि सुलभ, सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात किंवा नाही याबाबत नागरिकांचे अभिप्राय घेऊन सेवेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अभिप्राय कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याठिकाणी 10 तरुण ऑपरेटरची टिम बसविण्यात आली आहे.
नागरिकांना सेवा विहीत कालावधीत व विहित शुल्कात उपलब्ध झाली का? आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना वागणूक कशा प्रकारे देण्यात आली याचा नियमित आणि दैनंदीन आढावा कक्षातील ऑपरेटरकडून लाभार्थ्यांना थेट संपर्क साधून अभिप्रायाद्वारे घेतला जातो. नागरिकांना सेवेबाबत काही अभिप्राय, तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठी कक्षाच्यावतीने 07232- 3508000 या क्रमांकावर नोंदविता येते किंवा प्रत्येक केंद्रावर यासाठी QR कोड प्रसिद्ध करण्यात आला असून हा कोड स्कॅन करून देखील अभिप्राय नोंदविता येऊ शकतो.
कक्षातील ऑपरेटर रोज साधारणपणे 1 हजार 800 लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्यांच्याकडून अभिप्राय घेत आहेत. तर साधारणपणे कक्षाच्यावतीने जाहीर संपर्क क्रमांक व QR कोडद्वारे 150 च्या आसपास नागरीकांचे अभिप्राय कक्षास प्राप्त होतात. या अभिप्राय प्रणालीमुळे सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून देण्याचा विभागांचा कल वाढला आहे. तसेच सेवा केंद्रांवरही नियंत्रण स्थापित झाल्याने केंद्राच्या कामकाजात सुलभता, गतीमानता व पारदर्शकता आली आहे.
आयुक्त डॉ.एन.रामबाबू यांनी अभिप्राय कक्षास भेट दिल्यानंतर कक्षाच्या कामाची माहिती घेतली. हा उपक्रम अतिशय उत्तम असून सेवेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासोबतच पारदर्शकता येणार असल्याचे ते म्हणाले. कक्षातील ऑपरेटरशी देखील त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेला भेट दिली. आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याच्या सूचना आयुक्तांनी मागील भेटीत नगपरिषदेला केल्या होत्या. परंतु अद्याप केंद्र सुरु झाले नाही. दि.३१ जानेवारी पर्यंत केंद्र सुरु करू, असे आश्वासन नप अधिकारी यांनी आयुक्तांना दिले. जानेवारी अखेरपर्यंत केंद्र सुरु करून आयोगास कळवावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
०००