तळेगाव बाजार येथे सोयाबीन पिकाची शेती शाळा संपन्न
अकोला / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारांतर्गत मौजे तळेगाव बु. येथील पुरुषोत्तम मोहनराव खारोडे यांचे शेतात सोयाबीन पिकाच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. सदर शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड ही पट्टा पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे पिकाला चांगला सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली आहे. सोयाबीन पिकाची मशागत करताना खाली पट्ट्या मधून सोयीस्करपणे मशागत करता येते जसे की फवारणी करणे. असे सोयाबीन पिकाची निरीक्षणे घेताना मुद्दे प्रामुख्याने नोंदविली. सदर शेती शाळेला गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांनी आपल्या मार्गदर्शनात सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध किडी व त्यावरील उपाय योजना, कीटकनाशक व तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी, सोयाबीन पिकाची अंतर मशागत जसे की डवरनी व निंदणी करून शेत तन मुक्त ठेवावे. डवऱ्याला दोरी बांधून डवरणी करावी जेणे करून कमी पाऊस झाला असल्यास पाणी संग्रहित होते तसेच पाऊस जास्त झाल्यास सरीवाटे पाणी निघून जाते. तसेच शेतकरी बांधवांनी पीक फुलोऱ्यात असताना डवरणी करू नये. असे आव्हान केले. सदर शेती शाळेमध्ये फळबाग लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांधावरील फळपीक लागवड याबाबतची माहिती कृषी सहायक मनोज कुमार सारभुकन यांनी दिली. सदर शेती शाळेमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते