क्राइम
तो अपघात नसून घातपात

पोलिसांच्या तांत्रिक तपासात झाले उघड
गोंदिया / नवप्रहार मीडिया
फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सुनील भोंगाडे व शाहरुख शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या भावनेने हा खून करण्यात आला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 29 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजेदरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुलचुरटोला ते पिंडकेपार रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये मोरेश्वर खोब्रागडे (रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर गोंदिया) यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात संशयास्पद असल्याने खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती.
यावरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला. त्यात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सुनील भोंगाडे याच्या वडिलांचा खून 30 वर्षांपूर्वी झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सुनील आठ दिवसांपासून मोरेश्वर खोब्रागडे यांच्या मागावर होता. संधी मिळताच त्याने खोब्रागडे यांची हत्या केली आणि अपघाताचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
पोलिसांनी या प्रकरणात 100 ते 150 च्यावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषणाची खात्री करून आरोपी सुनील धनिराम भोंगाडे (44, रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया) व त्याच्या दुकानात काम करणारा साथीदार आरोपी शाहरूख हमीद शेख (24, रा. कुऱ्हाडी) यांना अटक केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1