गिरोला येथील सागर वसाहत विकासापासून वंचित
विकासाला ब्रेक: मूलभूत सोयीचा अभाव
जवाहरनगर ( भंडारा) : भंडारा जिल्हा पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काचे निवारा मिळावा याकरिता तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर यांचे संकल्पनेतून गट ग्रामपंचायत अंबाडी( गिरोला) येथील पवनी भंडारा राज्य महामार्गापासून सातशे मीटर अंतरावर ६ एकरात २०११ ला सागर वसाहत या नावाने पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत तयार करण्यात आले आहे. सध्या या वसाहतीत ९५ प्लॉट धारक असून १५ पोलिस कर्मचाऱ्यांनी पक्के घरे बांधून वास्तव्य करीत आहेत.तेव्हापासून ते आजपर्यंत या वसाहतीतील मुख्य विकास कामाला ब्रेक लागला असून मूलभूत सोयीचा अभाव जाणवत आहे.
१३ वर्षाचे कालावधी लोटूनही वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबीयांना पावसाळ्यात चिखलातून व ईतर वेळेस खड्यातून ये जा करावी लागते. व सांड पाण्याकरिता नाल्या नसल्याने हे पाणी घराजवळच साचून राहते त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. वस्ती तयार झाली तेव्हा पासून या वसाहतीतील वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांकडून गट अंबाडी ( गिरोला) कर वसूल करीत आहे.मात्र ग्रामपंचायत व जनप्रतिनिधी कडून येथील मूलभूत विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने या वसाहतीला विकासापासून वंचित ठेवले आहे. करिता येथील मूलभूत सुविधेतील कामाकडे ग्रामपंचायत सह जनप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे